मुंबई | राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र तरीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे कठीण झाले आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा, मॉल्स, अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिकांवर घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर महाराष्ट्र सायबरने प्रत्येक पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
तुमच्या मुलांकडे तुमचे लक्ष आहे का? कारण गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे.
त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. ७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांनी या गोष्टीकडे जास्त खबरदारी लक्ष द्यावे.
जर मुले ऑनलाईन चॅटिंग करत असतील तर समोरची व्यक्तीची माहिती करून घेणे आवश्यक आहे. ही मुले कोणत्या संकेतस्थळावर क्लीक करत आहेत किंवा कोणते संकेतस्थळ बघत आहेत यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
पालकांनी पोर्नोग्राफिक संकेतस्थळ शोधून क्लिक करणे टाळायला हवे. कारण, सध्या चाइल्ड पोर्नोग्राफी बघण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कुणी ऑनइलान धमकावत नाही ना, याची खात्री करायला हवी.
आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स आणि त्यांचे पिन क्रमांक पाल्यास देण्याचे टाळावे. ऑनलाइन खरेदी करताना मुलांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा अशा सूचना महाराष्ट्र सायबरकडून देण्यात आल्या आहेत.
कारण गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आपली मुले अशा कोणत्याही जाळ्यात अडकू नये याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे.