Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या गेलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा त्यांच्याशी निकटचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, मंत्रिपद गमावल्यानंतरही त्यांनी सरकारी सातपुडा बंगला (Satpuda Bungalow) अद्याप रिकामा केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत
धनंजय मुंडे यांचा बंगला आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देण्यात यायचा होता. २३ मे रोजी शासनाने आदेशही काढला. परंतु मुंडेंनी बंगला न सोडल्याने भुजबळ यांचा गृहप्रवेश थांबला आहे. सरकारी नियमानुसार मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत सरकारी निवासस्थान रिकामे करणे अपेक्षित असते. मात्र, साडेचार महिने उलटून गेले तरी मुंडे अद्याप सातपुडा बंगला रिकामा करण्यास तयार नसल्याने त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. हा दंड आता तब्बल ४२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या प्रकरणामुळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP Ajit Pawar Faction) दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. एका बाजूला मुंडे बंगला रिकामा करण्यास टाळाटाळ करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भुजबळ यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
इतर मंत्र्यांचे सरकारी बंगले
मुंडेंव्यतिरिक्त इतर मंत्र्यांना त्यांच्या पदानुसार वेगवेगळे सरकारी बंगले देण्यात आले आहेत. त्यात राम शिंदे (Ram Shinde) निवासस्थान, ज्ञानेश्वर नावेकर (Gnaneshwar Navkar) शिवगिरी, राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ विशाळगड, गिरीश महाजन (Girish Mahajan) सेवासदन, गुलाबराव पाटील जेतवन, संजय राठोड (Sanjay Rathod) शिवनेरी, पंकजा मुंडे (Pankaja Munde) पर्णकुटी, अतुल सावे शिवगड, आशिष शेलार (Ashish Shelar) रत्नसिषु आणि इतर मंत्र्यांचेही निश्चित बंगले आहेत.
या वादामुळे सरकारवर आणि प्रशासनावर दोन्हीकडून दबाव वाढला आहे. आता मुंडे सरकारी बंगला कधी रिकामा करतात आणि भुजबळ कधी गृहप्रवेश करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.