निवडणुकीनंतर पंढरपूरात कोरोनाचा उद्रेक; ऑक्सिजनच्या तुटवड्याने रुग्ण अक्षरश तडफडताहेत

सध्या देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. अशातच ऑक्सिजनचा साठा, रेमेडीसीवर इंजेकशन्सचा तुटवडा आणि अपुरी आरोग्य सुविधा यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

नुकतीच महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची निवडणूक पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जत्रा पंढरपुरात भरली होती. कोणीही यामध्ये सोशल डिस्टनसिंगच पालन केलं नाही.

जशी-जशी निवडणूक संपली तसा कोरोनाने पंढरपुरात शिरकाव केला आणि होत्याचे नव्हते झाले. कोरोनामुळे आता पंढरपुरात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण पडू लागला आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पंढरपुरात आता चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑक्सिजनच्या असणाऱ्या कमतरतेमुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे. हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा ऑक्सिजन कसा उपलब्ध करायचा? या काळजीत आहे.

आम्हाला रेमेडीसीवर नको, लसही नको. पण किमान मरत चाललेल्या रुग्णाला शेवटचा श्वास घ्यायला ऑक्सिजन तरी द्या, अशा पद्धतीची आर्जव रुग्णांचे नातेवाईक आता करताना दिसत आहेत.

या परिस्थितीवर राजकीय नेतेही आता हतबल झाल्याचे चित्र असून सोलापूरचे विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी आता काहीही करून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.