मुंबई | राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. या निवडणूकीच्या प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. पण नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांच्या लिलावाप्रकरणी निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द केल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांच्या लिलावाप्रकरणी व्हिडीओ व्हायरल होत बरीच चर्चा झाली होती. यानंतर याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या जाहिर लिलावाचे आता पुरावे मिळाल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी या ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द केली आहे.
आतापर्यंत आपण अनेक लिलाव झाल्याचे ऐकले आहे. पण सरपंच पदाचा लिलाव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या लिलावानुसार १७ सदस्यांच्या उमरणे या गावाची निवडणूक बिनविरोध केली जाणार होती. तसेच खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निवडणूक आयुक्त यू. पी. मदान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नाशिक आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना भारतीय दंड विधानाचे कलम १७१(क) अथवा अन्य कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते. त्याबरोबरच आयोगास अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचा भंग झाल्याचे सकृतदर्शी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढण्याची सर्वांना समान संधी मिळू शकत नाही. निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. असे निवडणूक आयुक्त मदन यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल; सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर
उदयनराजेंचा शब्द राखला! साताऱ्यामधील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध
गुलाल आमचाच! ४५ वर्षाची परंपरा कायम ठेवत शिवसेनेनं ग्रामपंचायतीवर फडकावला भगवा!