Share

Eknath Shinde: ‘सीएम’ला सोन्याची शिंगे येतात का? एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Eknath Shinde : इगतपुरी (Igatpuri) येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणादरम्यान एक वेगळाच मुद्दा उचलत वातावरण तापवलं. ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना लोक त्यांना ‘सीएम’ म्हणायचे, पण त्यांच्या मते ‘सीएम’ म्हणजे कॉमन मॅन. “चीफ मिनिस्टर म्हटलं म्हणून कुणाला सोन्याची शिंगे येतात का? आणि कॉमन मॅन म्हटलं म्हणून ती नाहीशी होतात का?” असा सवाल करून त्यांनी थेट नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

या पुढे त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ‘शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’ म्हणत, आपल्या पक्षाची ताकद आणि नेतृत्वाची ठसठशीत छाप यावेळी दाखवून दिली. तसंच जनतेने त्यांना दिलेलं ‘डीसीएम’ म्हणजे Dedicated to Common Man हे पद ते अभिमानाने वाहून नेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सभेत पुढे बोलताना शिंदे यांनी नगरविकास, पाणीपुरवठा, उद्योग असे महत्वाचे विभाग सध्या त्यांच्या जबाबदारीत असल्याचा उल्लेख केला. इगतपुरी आणि भगूर परिसरातील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला. “तुम्ही जे सांगाल ते मी करणार, पण २ डिसेंबरला महायुतीला विजयी करा,” असं थेट आवाहन त्यांनी जनतेला केलं.

इगतपुरीतील महायुतीच्या उमेदवारांच्या सभेत शिंदे यांनी विरोधकांच्या सत्ताकाळावर जोरदार टीका केली. अनेक वर्षे सत्तेत राहूनही शहराचा विकास थांबला, निर्णयक्षमतेचा अभाव होता, असा आरोप त्यांनी केला. “मुंबईत बसून इगतपुरीचा विकास कसा होणार? शहरात काय दिवे लावलेत?” अशा शब्दांत त्यांनी विरोधी गटांवर प्रहार केला.

भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि गुंडगिरीमुक्त इगतपुरी निर्माण करण्यासाठी महायुतीला सत्ता द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी संजय खातळे, फिरोजभाई पठाण, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, रघुनाथ तोकडे, संपतराव काळे, पांडुरंग वारुंगसे यांसारखे स्थानिक नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now