Aditya Thackeray : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मागील दोन दिवसांपासून रंगत असलेल्या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतःहून प्रवेश करत टीका केली. यावरून आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, “शिंदेंनी किमान लाज ठेवून टीका करायला हवी.”
हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नागपूरमध्ये पोहोचताच त्यांनी अमित शाह यांच्या हिंदुत्वावरील आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. “मला हिंदुत्व शिकवायला भाजप की संघाची गरज नाही,” असा घणाघात त्यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तरादाखल टोलेबाजी करत टीका केली. आपल्या वडिलांवर झालेल्या वक्तव्याने व्यथित झालेल्या आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर तिखट शब्दांत निशाणा साधत त्यांना “विषारी साप आता अॅनाकोंडालाच चावायला आलेत!” अशी बोचरी टिप्पणी केली.
अधिवेशन परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, आपल्याला राजकारण शिकवणारे ज्येष्ठ नेते कोण होते हे शिंदेंनी विसरू नये. राजकारणात पहिलं पाऊल कोणाच्या हाताखाली ठेवून पुढे गेले, हे त्यांना आठवण करून देण्याची वेळ आली आहे. त्यांनी केलेली टीका केवळ राजकीय नाही, तर कृतघ्नतेचं उदाहरण आहे, असा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे, अमित शाह यांच्या पाठिशी उभं राहताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. “मुंबई लुटणारे आणि आरोग्यसेवा डबघाईला आणणारे नेते अमित शाहांवर बोलायची भाषा कुठून आणतात?” अशी सवालांची सरबत्ती त्यांनी केली. यावरून ठाकरे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला.
मुंबईतील पागडी आणि सेस इमारतींबाबत अधिवेशनात मोठी घोषणा करत एकनाथ शिंदेंनी भाडेकरूंना जास्त एफएसआय देण्याचे संकेत दिले. मात्र, आदित्य ठाकरेंनी या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या मते, हा निर्णय भाडेकरू किंवा सामान्य नागरिकांसाठी नसून काही बिल्डर्सना लाभ देण्याच्या हेतूने घेतला जात आहे.
“मंत्र्यांना स्वतःच्या खात्याची माहिती नसताना हे निर्णय घेतले जातात. यात ६ महिने जमीन मालकांना आणि नंतर ६ महिने रहिवाशांना स्थळ मिळणार. हा प्रकारच चुकीचा आहे,” असा आरोप त्यांनी केला.
मुंढवा परिसरातील बिबट्यांच्या हालचालींबाबत आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, “सरकार जंगलं तोडतंय, म्हणूनच बिबटे मानवी वस्तीत शिरत आहेत. ही नैसर्गिक चुक नाही, तर प्रशासनाच्या ढिसाळ धोरणांची परिणती आहे.” उद्या सभागृहात मुंढवा प्रकरणी अधिक माहिती मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.






