Eknath Khadse demand Ajit Pawar Resignation : पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील ४० एकर जमिनीच्या कथित व्यवहारावरून राजकीय वाद चांगलाच चिघळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या मालकीच्या अमेडिया एंटरप्रायझेस (Amedia Enterprises) कंपनीने ही जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या जमिनीचं बाजारमूल्य तब्बल १८०० कोटी रुपये असल्याचा दावा होत असून, हा संपूर्ण व्यवहार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
राज्य सरकारने या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त केली असून, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले (Suryakant Yewale) आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू (Ravindra Taru) यांना निलंबित करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP Sharad Pawar Group) नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी थेट मागणी केली आहे की, “या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.”
‘व्यवहारात मोठी बनवाबनवी’ – खडसे
खडसे यांनी सांगितलं की, पार्थ पवार यांच्या कंपनीकडून झालेल्या जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचं दिसतं. “ही जमीन महार वतनाची (Mahar Watana Land) आहे. अशा प्रकारची जमीन खरेदी करण्यासाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक असते, मात्र ती घेतलेली दिसत नाही. त्यामुळे हा व्यवहार रद्द व्हायला हवा,” असं खडसे म्हणाले.
‘३०० कोटी कुठून आले, कोणाच्या खात्यात गेले?’
खडसे पुढे म्हणाले, “एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी ३०० कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी करू शकते? एवढे पैसे कुठून आले, कोणत्या खात्यात गेले, आणि व्यवहारासाठी वापरलेली कागदपत्रं खरी की खोटी? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत.”
खडसे यांनी सध्याच्या सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, आणि प्रकरण त्यांच्या मुलाचं आहे. अशा परिस्थितीत सरकार स्वतःच्या कुटुंबाविरोधात चौकशी करेल, हे पटत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या (High Court) न्यायाधीशांकडून केली जावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.‘चौकशी होईपर्यंत दादांनी राजीनामा द्यावा’
“जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत अजित पवारांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी खडसे यांनी स्पष्ट शब्दांत केली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही भाष्य करत विचारलं, “फडणवीस यांनी पूर्वी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दाखवले होते आणि अजित पवार यांना ‘चक्की पिसिंग पिसिंग’ म्हटलं होतं. आता त्या व्यवहारावर कारवाई का होत नाही?”
खडसे यांनी पुढे म्हटलं की, “या प्रकरणात केवळ प्रशासकीय कारवाई नको. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या समितीकडून या व्यवहाराची चौकशी व्हावी. तेव्हाच या प्रकरणामागचं सत्य राज्यातील जनतेसमोर येईल.”





