Farmer Success Story : शेतीत योग्य वेळी पिकांची लागवड करणे हे नफ्याचं महत्त्वाचं रहस्य मानलं जातं. बाजारात कोणतंही पीक एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आल्यास त्याचे दर कोसळतात, पण योग्य वेळ साधून आणि विकेल तेच पिकेल या तत्त्वावर लागवड केल्यास कमी कालावधीत चांगला नफा मिळवता येतो. भाजीपाला पिकांमध्ये हे तत्त्व विशेष प्रभावी ठरतं.
अलीकडेच जास्त पावसामुळे अनेक भागात भाजीपाला खराब झाला आणि त्यामुळे बाजारभाव कडाडले. काही दिवसांपूर्वी कोथिंबीर आणि मेथीच्या दरांची अवस्था इतकी वाईट होती की, काही शेतकऱ्यांनी उभी पिकं रोटाव्हेटरने नष्ट केली. पण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील (Ausa Taluka, Latur) एका शेतकऱ्याने या परिस्थितीतूनच सोनं केलं.
कोथिंबिरीने १९ लाखांचं उत्पन्न
पंडित काकडे (Pandit Kakade) हे आशिव (Ashiv) गावचे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या साडेसहा एकर शेतात कास्ती कोथिंबीर (Kasti Coriander) लागवड केली आणि तब्बल १९ लाख २५ हजार रुपयांचं उत्पन्न मिळवलं. कास्ती कोथिंबीर इतर प्रकारच्या कोथिंबिरीपेक्षा अधिक चमकदार, सुगंधित आणि टिकाऊ असल्याने तिची महाराष्ट्रासोबतच बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांतही मोठी मागणी आहे. पंडित काकडे यांनी २०१७ पासूनच या कोथिंबीरीची लागवड सुरू केली आणि सातत्य ठेवलं आहे.
या कोथिंबीरीच्या लागवडीसाठी एका एकरावर सुमारे २१,७०० रुपये खर्च येतो. एका एकरातून अंदाजे ५५० क्रेट कोथिंबीर मिळते. एका क्रेटला सरासरी ५५० रुपये भाव मिळाल्यास, साडेसहा एकरातून साधारण ३५०० क्रेट उत्पादन होतं. यामुळे पंडित काकडे यांच्या हातात तब्बल १९.२५ लाख रुपये जमा झाले.
इतर पिकांपेक्षा किती फायदेशीर?
सोयाबीनच्या तुलनेत ही कोथिंबीर अत्यंत फायदेशीर ठरते. सोयाबीनसाठीही लागवडीचा खर्च सुमारे २०-२२ हजार रुपये असतो, पण त्यातून एकरी जास्तीत जास्त ४०,००० रुपये उत्पन्न मिळतं आणि खर्च वजा केल्यावर केवळ २०,००० रुपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात. उलट, कास्ती कोथिंबिरीला योग्य भाव मिळाल्यास एकरी सव्वा तीन लाख रुपये नफा मिळवता येतो.
योग्य वेळ साधून, दर्जेदार व मागणी असलेलं पीक निवडून आणि बाजारभावावर लक्ष ठेवून औसा तालुक्यातील पंडित काकडे यांनी ४५ दिवसांतच लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.