महाराष्ट्राने लस केंद्राकडे नाहीतर काय अमेरिकेकडे मागायची का? डॉ. सुभाष साळुंखे संतापले

माजी आरोग्य सल्लागार आणि राज्याचे प्रमुख कोरोना सल्लागार डॉ. साळुंखे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर साळुंखे यांनी हर्षवर्धन यांना खडे बोल सुनावले आहेत.

ते म्हणाले आहेत की, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेला व सरकारच्या कोरोना नियंत्रण कामाला नालायक ठरविण्याचा केलेला दुर्देवी आहे. महाराष्ट्रात कोरोना पेटला म्हणून आज काही लोक टाळ्या पिटत आहेत.

एप्रिलनंतर राज्यातील कोरोना कमी होईल आणि पश्चिम बंगालसह निवडणुका असलेली पाच राज्य तसेच उत्तर प्रदेशमध्ये कोरोना पेट घेईल तेव्हा महाराष्ट्रावर टीका करणारी मंडळी काय करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले की, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मी १९९५ पासून ओळखतो.

तेव्हा पोलीओ निर्मुलनासाठी त्यांनी चांगले काम केले होते. जागतिक आरोग्य संघटनेतही त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांना देशातील आरोग्य व्यवस्थेची पुर्ण जाण असताना त्यांनी बुधवारी जी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेवर जी टीका केली ती दुर्देवी असून निव्वळ राजकीय हेतूने केली आहे हे मी जबाबदारीने सांगतो.

मी ठामपणे सांगतो की महाराष्ट्राची आरोग्यसेवा ही देशातील अग्रगण्य आरोग्य सेवा आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ या राज्यातील आरोग्यसेवा देशात सर्वोत्तम आहे. बिहारमध्ये मध्यंतरी कोरोना रूग्णांच्या संख्येची लपवाछपवी उघडकीस आली होती. महाराष्ट्रात कसलीही लपवाछपवी केली जात नसल्याने महाराष्ट्राची आकडेवारी मोठी दिसते.

उत्तर प्रदेशसह कोणत्याही राज्यातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणती यंत्रणा आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कुंभमेळा संपल्यानंतर तेथे कोरोना वाढेल हे लक्षात घेऊन पाच राज्ये व कुंभमेळाच्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या आहेत यावर केंद्राने लक्ष केंद्रित केले पाहिजे.

महाराष्ट्रात रोज ५० हजार रूग्ण सापडत आहेत. ज्येष्ठ नागरीकांसोबत २५ वर्षांवरील तरूणांना लस देणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने जी बाजू मांडली आहे ती अगजी बरोबर आहे. राज्याच्या मागणीनुसार पुरेसा लस पुरवठा करणे ही केंद्राची जबाबदारी आहे.

लस वितरणाचा संपुर्ण ताबा केंद्राकडे असताना महाराष्ट्र सरकार लसीची मागणी ही केंद्राकडे नाहीतर काय अमेरीकेकडे करणार का? अशी टीका त्यांनी केंद्रावर केली आहे आणि महाराष्ट्र सरकारची बाजू घेतली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राच्या मागणीला केंद्र सरकार काय उत्तर देतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.