Sanjay Raut : नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे (NDA) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) हे दणदणीत मतांनी विजयी ठरले. त्यांना तब्बल 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली, तर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांना फक्त 300 मतांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा रंगली असून, काही मतं फुटल्याचं आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena Thackeray group) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे गटाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातून मतं फुटल्याचा आरोप केला होता. त्यात ठाकरे गटाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP Sharad Pawar group) ची मतं सामील असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या आरोपावर राऊतांनी थेट पलटवार करत शिंदे गटाला “तुम्ही विकले गेलात, शरण गेलात, स्वाभिमान गहाण ठेवला आणि आता निष्ठावंतांवर शिंतोडे उडवताय” अशा कठोर शब्दांत सुनावलं.
राऊत म्हणाले की, जास्त शहाणपणा करू नका. नाहीतर नेपाळमध्ये लोकं रस्त्यावर उतरले तसेच प्रकार महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत घडायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे, हे लक्षात ठेवा.
यावेळी त्यांनी मतदानातील तफावतीवरून देखील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, इंडिया आघाडीची 314 मतांची ताकद असूनदेखील उमेदवाराला फक्त 300 मतं मिळाली आणि 15 मतं अवैध ठरवली गेली. ही मतं खरं तर इंडिया आघाडीला मिळणारी होती, मात्र काही कारणांनी नाकारली गेली. सत्ता आणि पैशाच्या जोरावर काही मतं वळवली गेली, हे स्पष्ट आहे असा आरोप त्यांनी केला.
राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटलं की, स्वत: गुलामी स्वीकारली आणि विकले गेलात, तरीही निष्ठावंतांवर टीका करता. असा मेंदू गुडघ्यात असलेल्या लोकांनी आरोप करणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खरी निष्ठा दाखवणाऱ्यांचा अपमान करू नका, अन्यथा परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा त्यांनी पुन्हा दिला.