सध्या घटस्फोट देऊन संबंधित महिलेला पोटगी देण्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर येत असतात. मात्र आता एक अशी घटना समोर येत आहे, ज्यामध्ये महिलेला तिच्या अनुपस्थितीत एक रुपया भरपाई देऊन मोबाईलवर घटस्फोट दिला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
एक रुपया भरपाई देऊन मोबाईलवर घटस्फोट देण्याचा प्रकार नाशिक जवळ सिन्नर येथे घडला आहे. या प्रकरणात अन्याय झालेल्या महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. सासरच्या कुटुंबियांनी जात पंचाकडे केवळ एक रुपया नुकसान भरपाई देऊन मोबाईलवर घटस्फोट दिल्याचा महिलेचा आरोप आहे.
सिन्नर मधील या पीडित महिलेचे अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे राहणाऱ्या पुरुषाशी 2019 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जातपंचायत बसविली.
जातपंचायतीने या महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट केला. विशेष म्हणजे हा घटस्फोट घेत असताना सासरकडील लोकांनी भरपाई म्ह्णून केवळ एक रुपया पंचांकडे दिला. त्यानंतर, पंचांनी फोन करून महिलेला जात पंचायतीचा निर्णय कळवला. जात पंचायतीचा निर्णय कळल्यावर महिलेला धक्का बसला.
पीडित महिलेला या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मदत केली. त्यांनी संबंधित पंचायात विरोधात आणि सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा पीडित महिलेच्या पतीने दुसरं लग्न केल्याचं तिला कळाले. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नसताना नवऱ्याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बोट ठेवले.
मात्र, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नसताना नवऱ्याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो हे म्हणणे जातपंचायतीला मान्य नाही. तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत ती लढायला तयार झाली. मात्र पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तिला अवघड जात आहे.