Pahalgam attack : पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट परिसरात शनिवारी हजारो नागरिकांनी पाकिस्तान सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले. आंदोलनात प्रचंड गर्दी उसळली होती आणि संतप्त नागरिकांनी सरकारविरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. इतकी मोठी उपस्थिती होती की, मुंगी शिरायलाही जागा नव्हती.
गिलगिटमध्ये झालेल्या या आंदोलनात केवळ स्थानिकच नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरच्या इतर भागांतूनही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा निषेध करत लोकांनी संताप व्यक्त केला. गिलगिट, खैबर पख्तून आणि बलुचिस्तान या भागांतील नागरिकांना पाकिस्तान सरकारने अनेक वर्षांपासून दुय्यम नागरिकासारखी वागणूक दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
याच दरम्यान, बलुचिस्तानमध्ये स्वतंत्रतेसाठी सुरू असलेल्या चळवळीनेही जोर पकडला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने क्रूर हल्ले चढवले असून, रेल्वे हायजॅकपासून सैन्याच्या ताफ्यावर थेट हल्ले करण्यापर्यंत त्यांनी अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गडद झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर गिलगिटमधील प्रचंड आंदोलनाने पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गिलगिटसह संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी संतापाचा लाट वाढताना दिसत आहे, आणि या असंतोषाचा पुढे कसा उद्रेक होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
discontent-erupts-in-pakistan-after-pahalgam-attack