Dharmendra: बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून लौकिक मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. प्रकृती सतत बिघडत असल्याने काही दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. नंतर राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबाने माध्यमांना अधिकृत माहिती न देता शांतपणे अंत्यसंस्काराची तयारी केली आणि केवळ अर्ध्या तासांत पार्थिवावर अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास मुलगा सनी देओल (Sunny Deol) यांनी मुखाग्नी दिला.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजलींचा ओघ सुरू झाला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, तसेच विविध पक्षांचे नेते या दिग्गज कलाकाराच्या आठवणी उजाळून त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विशेष भावनिक शब्दांत श्रद्धांजली व्यक्त केली.
अंत्यसंस्काराबाबत माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तथापि शासनाच्यावतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, घराच्या आत हेमा मालिनी (Hema Malini), सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) उपस्थित होते.
त्यांनी पुढे सांगितले की, खासदार म्हणून 2004 ते 2009 या काळात धर्मेंद्र यांच्याशी अनेकदा भेट झाली होती आणि त्यांच्यात चांगले संबंध होते. सिनेसृष्टीतील या कलाकाराबद्दल त्यांच्याकडे अनेक आठवणी असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना म्हटले की, भारतीय चित्रपटसृष्टीत ‘सुपरस्टार’ म्हटलं की एक काळ असतो, आणि तो उतरणीवरही येतो. परंतु धर्मेंद्र यांच्या बाबतीत ही व्याख्या लागू होत नाही.
१९६० च्या दशकात देखणा, सुदृढ, मोहक हास्य असलेला आणि मर्दानी व्यक्तिमत्त्व घेऊन पडद्यावर झळकलेला हा अभिनेता पुढील अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला. दिग्दर्शक बिमल रॉय (Bimal Roy), ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee), रमेश सिप्पी (Ramesh Sippy), राज खोसला (Raj Khosla) अशा दिग्गजांनी त्यांना आपल्या चित्रपटांचे मुख्य पात्र म्हणून निवडले. सरळ, प्रामाणिक आणि सर्वसामान्यांना भावणारे व्यक्तिमत्त्व ही त्यांची खरी ओळख असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली देताना म्हटले की, कृष्णधवल काळापासून ते आधुनिक तांत्रिक सिनेमापर्यंत धर्मेंद्र सक्रिय राहिले. त्यांच्या भूमिकांमध्ये स्वप्नाळू तरुण, तडफदार नायक ते भावनिक व्यक्तिरेखा अशा विविध छटा दिसतात. ‘शोले’मधील वीरूची भूमिका असो किंवा तडफ, मैत्री आणि उत्फुल्लता यांचे दर्शन घडवणाऱ्या अन्य भूमिका धर्मेंद्र यांनी अभिनयाच्या माध्यमातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचा एक तेजस्वी तारा निखळल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
अजित पवार यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, धर्मेंद्र यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकता, सहजता आणि भावनिक ताकद ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’ अशा अनेक चित्रपटांत आजही झळकते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ हा मान मिळाला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.





