Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या तब्येतीबाबत सध्या संपूर्ण बॉलिवूड चिंतेत आहे. तब्बल अकरा दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर घरीच पुढील उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबद्दल अजूनही चाहत्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.
अभिनेते घरी परतल्याचं ऐकून अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि मित्रमंडळी त्यांना भेटण्यासाठी गेले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), निर्माता गुड्डू धनोआ (Guddu Dhanoa) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी धर्मेंद्र यांची तब्येत जाणून घेतली. पण, त्यांना भेटून परतणारा प्रत्येकजण थोडासा चिंतेत दिसला. त्यामुळे चाहत्यांच्या मनातही अस्वस्थता वाढली आहे.
हेमा मालिनींचं भावनिक वक्तव्य
सध्याच्या परिस्थितीबद्दल धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “हा माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे. धरमजींची तब्येत आमच्यासाठी मोठी चिंता बनली आहे. त्यांच्या मुलांनाही रात्री झोप लागत नाही. मी स्वतः खचून जाऊ शकत नाही, कारण अनेक जबाबदाऱ्या आहेत. पण हो, ते रुग्णालयातून बाहेर पडले आणि घरी परतले याचा आम्हाला दिलासा आहे. त्यांना त्यांच्या लोकांमध्ये राहणं आवश्यक आहे. बाकी सगळं आता देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.” हेमा मालिनींचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे.
डॉक्टर आणि कुटुंबीयांकडून दिलासा
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीक समदानी (Dr. Pratik Samdani) यांनी सांगितलं की, “धर्मेंद्रजींना बुधवारी सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांच्यावर आता पुढील उपचार घरातच केले जातील.” देओल कुटुंबीयांनी घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांना आपल्या वातावरणात राहून लवकर बरे वाटेल.
देओल कुटुंबीयांचं अधिकृत निवेदन
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सनी देओल (Sunny Deol) यांच्या टीमने एक निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे, “धर्मेंद्रजींची प्रकृती सुधारत आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, पुढील उपचार घरातच सुरू राहतील. आम्ही सर्व माध्यमांना आणि जनतेला विनंती करतो की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
संपूर्ण देशभरातील चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा देणं सुरू केलं आहे. अनेकांनी त्यांच्या जुन्या चित्रपटांच्या दृश्यांद्वारे त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. धर्मेंद्र हे ८८ वर्षांचे असून, त्यांचं आरोग्य गेल्या काही दिवसांत चढ-उतार होत आहे. मात्र, त्यांच्या जिद्दी आणि सकारात्मक वृत्तीवर सगळ्यांनाच विश्वास आहे की ते लवकरच पुन्हा तंदुरुस्त होऊन आपल्या चाहत्यांसमोर दिसतील.






