Dhananjay Munde : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात गेले आठ दिवसांपासून मुक्काम करणारे अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे सध्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर मन:शांतीच्या शोधात असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरणातील गंभीर आरोप आणि करुणा शर्मा यांच्या आरोपांमुळे सतत चर्चेत असलेल्या मुंडेंनी अलिकडेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या खात्याची जबाबदारी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहे.
या घडामोडींनंतर मुंडे इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात दाखल झाल्याचे उघड झाले असून, या निर्णयावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे. मन:शांतीसाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून देखील वातावरण तापले आहे. वैष्णवीने सासरी होणाऱ्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, तिच्या सासरच्या लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये तिचा पती शशांक हगवणे आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शशांक हगवणे हा अजित पवार गटाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
या संदर्भात विचारणा झाल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “वैष्णवीला न्याय मिळायलाच हवा. महिला आयोगाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलिसांनीही कठोर कारवाई केली पाहिजे. सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील, पण प्रत्येक टप्प्यावर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.”
याशिवाय पंकजा मुंडे यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सुरू होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. “अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार विविध राज्यांत पर्यावरण जनजागृतीसाठी कार्यक्रम राबवले जातील,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी प्लास्टिकच्या वापराविरुद्ध जनजागृतीचे आवाहनही केले.
dhananjay-munde-visits-vipassana-center-in-igatpuri-for-peace-of-mind