Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आले होते. या घटनेवेळी सरपंचांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून देशमुख यांना जबरदस्तीने गाडीतून उचलण्यात आले.
यानंतर, संबंधित चालकाने ही माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास सांगितले. मात्र, जेव्हा हा प्रत्यक्षदर्शी पोलिस ठाण्यात पोहोचला, तेव्हा त्याला तब्बल तीन ते साडेतीन तास तिथेच बसवून ठेवण्यात आले, असा धक्कादायक खुलासा त्याने आपल्या जबाबात केला आहे.
केज पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका करत, काही अधिकारी आरोपींना मदत करत असल्याचा आरोप केला. “प्रत्यक्षदर्शीचा जबाब हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, मात्र पोलिसांनी त्यालाच तासन्तास बसवून ठेवलं.
यावेळी पीआय महाजन आणि बनसोडे हेच अधिकारी होते. त्यामुळे हे संपूर्ण कटात सामील असल्याचं स्पष्ट होतं. जर पोलिसांनी वेळीच योग्य पद्धतीने कारवाई केली असती, तर कदाचित संतोष देशमुख वाचले असते,” असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला.
10 पोलिस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे – दमानियांची मागणी
अंजली दमानिया यांनी सांगितले की, आवाडा एनर्जी कंपनीने मे 2023 पासून गुन्हेगारांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. “28 मे रोजी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचे अपहरण झाले होते आणि हे सगळे प्रकार सातपुडा बंगल्यात चालले होते. जर तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती, तर आज संतोष देशमुख जिवंत असते,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे असेही सांगितले की, “पीआय महाजन यांना या संपूर्ण कटाची पूर्ण कल्पना होती, तरीही त्यांनी योग्य ती कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना आणि अन्य 10 पोलिस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे. हे अधिकारी आरोपींची मदत करत होते, यामध्ये त्यांचा सहभाग होता, असे पुरावे आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
धनंजय मुंडेंवरही आरोप
सुदर्शन घुलेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरही दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “त्याच्या जबाबात गुन्हा कसा घडला याचा उल्लेख आहे, मात्र अपहरणानंतर आरोपी कुठे गेले, त्यांनी पैसे कुठे ठेवले, ते पुणे आणि भिवंडीत कसे पोहोचले, याबाबत माहिती दिलेली नाही.
पोलिसांनी हे तपासलेच नाही, यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या संपूर्ण कटात धनंजय मुंडेंनी समन्वयकाची भूमिका बजावल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये पुरावे आहेत, त्यामुळे हे सत्य बाहेर येईल, म्हणून आरोपींना वाचवले जात आहे,’ असे दमानिया यांनी सांगितले.
“कुणाल कामरावर थर्ड डिग्री, मग इथे का नाही?”
अंजली दमानिया यांनी पुढे बोलताना राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “शंभूराज देसाई सांगतात की, कुणाल कामरावर थर्ड डिग्री वापरा, मग या प्रकरणात ती का वापरली जात नाही? कृष्ण आंधळेचा तपास का होत नाही?” असा सवाल त्यांनी केला.
त्या पुढील आठवड्यात संभाजीनगर येथे जाऊन न्यायालयीन समितीकडे सगळी कागदपत्रे आणि पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “या प्रकरणात सरकार, पोलीस आणि राजकीय व्यक्ती एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे प्रकरण न्यायापर्यंत पोहोचल्याशिवाय मी थांबणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.