Share

Dhananjay Munde : “खासदाराचं पोट दुखतय, तुतारी वाजवणं हे त्यांचं काम” , धनंजय मुंडेंचा बजरंग सोनावणेंवर जोरदार प्रहार

Dhananjay Munde : परळीत झालेल्या सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंचावरून भावनिक आणि आक्रमक भाषण करत आपल्या मतदारांना दिलेलं प्रेम, केलेलं काम आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांवर थेट भाष्य केलं. “विधानसभा निवडणुकीनंतर मला इथे पुन्हा सभा घ्यावी लागेल अशी कल्पनाही नव्हती, पण तुम्ही दाखवलेला स्नेह आयुष्यभराचं देणं आहे. सात जन्म घेतले तरी हे ऋण फेडू शकणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी लोकांशी जवळीक दाखवली. “मी कधीच जाती-पातीचं राजकारण केलं नाही, जो आला त्याचं काम केलं. म्हणून माझी उठाठेव होते,” असं सांगत त्यांनी स्वतःची भूमिका मांडली.

याच दरम्यान त्यांनी खासदार बजरंग सोनावणे (Bajarang Sonawane) यांच्यावर लक्ष्य साधत तीक्ष्ण टीका केली. “खासदाराचं काम तुतारी वाजवणं, ते तेच करत आहेत. त्यामुळे त्यांचं पोट दुखतंय,” अशा शब्दांत मुंडेंनी सरळ हल्ला चढवला. या वक्तव्यामुळे सभेत एकच खळबळ उडाली आणि नाराजी कुठे दडलेली नाही हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

‘मराठवाड्यात सर्वाधिक घरकुल आम्ही दिली’

आपल्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची आठवण करून देताना मुंडेंनी सांगितलं की पाणीपुरवठा, घरकुल, लाडकी बहीण, निराधार योजना यांसारख्या महत्वाच्या योजना परळीत आणि मराठवाड्यात सुरळीत सुरू आहेत. “गेल्या पाच वर्षांत या विभागात सर्वाधिक घरकुलांचा लाभ आम्ही दिला. रेल्वेची मोठी कामं झाली,” असं ते म्हणाले.

याच वेळी त्यांनी दीपक देशमुख यांच्यावरही निशाणा साधला. “ज्यांच्यामुळे माझं घर फुटलं त्यांनीच वैद्यनाथ मंदिरावर हातोडा चालवला. माझ्या वडिलांनी शिकवलं की एका हाताने दिलं ते दुसऱ्याला कळू नये. हात तुटल्यावर ४० लाख मदत केली. जे माझ्याशी बेईमानी करतात, ते तुम्हालाही करणार नाहीत याची काय खात्री?” अशी टीका त्यांनी केली.

‘परळीला बदनाम केलं जातंय… जातीपातीचं राजकारण नाही हे मतदानातून दाखवा’

आपल्या वैयक्तिक प्रकृतीवर बोलताना मुंडेंनी सांगितलं की गेल्या वर्षभरात दोनदा ते मृत्यूच्या दारातून परत आले. “माझं सर्वस्व तुमचंच आहे. इथे जातीपातीची भिंत नाही, हे मतांनी सिद्ध करा,” असं आवाहन त्यांनी केलं.
परळीची बदनामी गेल्या दोन वर्षांत जाणीवपूर्वक केली जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. “याचं उत्तर निवडणुकीत द्या,” असं ते म्हणाले.

नगरपरिषदेसाठीही त्यांनी मतदारांना संदेश दिला. “मला 44 हजार मतांनी निवडून दिलं. आता नगरपरिषदेलाही असाच न्याय द्या,” असं ते म्हणाले. थर्मल प्रकल्प रद्द झाल्यानंतर नव्या 350 मेगावॉट प्रकल्पाचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

‘कोई तुतारी नाही, कोई पंजा नाही… सिर्फ घडी!’

सभेच्या अखेरीस मुंडेंनी पुन्हा एकदा सोनावणेंवर निशाणा साधत त्यांचा घोषवाक्यसदृश टोला दिल. “कोई तुतारी नहीं, कोई पंजा नहीं… सिर्फ घडी, घडी, घडी!” यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now