Pune News : हृदयद्रावक! ड्युटीवर असताना पोलिसाला आली चक्कर, 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी अंत

Pune News : पुणे (Pune) शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (Dhanaji Bharat Vanve) यांचे वयाच्या ४२व्या वर्षी, कर्तव्य बजावत असतानाच दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना कात्रज मंडई चौक (Katraj Mandai Chowk) येथे बुधवारी (दि. १०) सायंकाळी साधारण ६.४५ वाजता घडली. वणवे हे त्यांच्या रोजच्या ड्युटीवर होते, तेवढ्यात त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले.

सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना साईस्नेह रुग्णालयात (Saisneh Hospital, Katraj) दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक वैद्यकीय अहवालात, वणवे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय अधिकारी

धनाजी वणवे हे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे वाहतूक पोलिस दलात कार्यरत होते. ट्रॅफिक नियमनाची जबाबदारी त्यांनी नेहमीच अत्यंत शांत, संयमी आणि प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांची विशेष ओळख होती. नागरिकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रस्त्यावर उभं राहून काम करणाऱ्या समर्पित पोलिसांपैकी एक अशी त्यांची प्रतिमा होती.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

धनाजी वणवे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचं अचानक जाणं कुटुंबासाठी मोठं आघात ठरलं आहे. पुणे पोलिस विभागाने त्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिस दलात शोककळा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar), वाहतूक विभागाचे अधिकारी आणि वणवे यांचे अनेक सहकारी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पोलीस दलातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना जीव गमावणारे वणवे हे एका समर्पित पोलिसाचे उदाहरण ठरले आहेत, अशी भावना विभागातील अनेकांनी व्यक्त केली आहे.