Sanjay Raut : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या गायब होण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतचोरी, घोटाळे आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्या भूमिकेचे मुद्दे विरोधकांनी हातात घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मतचोरीचा मुद्दा तीव्रपणे उपस्थित केला.
अमित शहा यांना पत्र
या संदर्भात राऊतांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहिले असून, माजी उपराष्ट्रपतींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच धनखड यांची तब्येत आणि सुरक्षा याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणीही केली आहे.
“पोलिस आम्हाला रोखू शकत नाहीत”
राऊत म्हणाले, “निवडणूक आयोग सरकारचं हस्तक म्हणून वागत आहे. आम्ही दिल्लीत आयोगाविरोधात मोर्चा काढणार असून, पोलीस आम्हाला अडवू शकत नाहीत. सर्व खासदार एकत्र येऊन देशाचं लक्ष वेधणार आहोत. विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या आयोगाला आम्ही थेट जाब विचारणार आणि गरज पडल्यास तुरुंगात जाण्यासही तयार आहोत. आयोग हा ‘दुतोंडी गांडूळ’ आहे, आणि आमचा त्यांच्यावर विश्वास नाही.”
चिन्ह आणि जागा चोरीचा आरोप
राऊतांनी आरोप केला की, “शिवसेनेचं नाव आणि चिन्ह चोरून आयोगाने दुसऱ्यांच्या हाती दिलं. तसेच अमोल कीर्तेकर (Amol Kirtikar) यांची जागा देखील चोरली. फडणवीसांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं आहे का? ते आयोगाच्या दरोड्यातील लाभार्थी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे चोरीचा माल आहे आणि त्यांनी गप्प राहिलं पाहिजे.”
गडकरींच्या मतदारसंघातील मतचोरी
याचबरोबर राऊतांनी दावा केला की, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मतदारसंघात सव्वातीन ते साडेतीन लाख मतांची चोरी झाली आहे. “गडकरींच्या भाच्याचं नाव मतदार यादीतून वगळलं गेलं, घरातील सदस्यांची नावे देखील कापण्यात आली. त्यांनाही कोणाला तरी राजकीयरीत्या पाडण्याचा डाव होता. जर त्यांच्या मतदारसंघात इतक्या प्रमाणात मतं वगळली असतील, तर विरोधकांचं काय झालं असेल याचा विचार करावा,” असं राऊत म्हणाले.






