महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने लॉकडाऊन काळात लोकांना एका पैशाची मदत केली नाही – फडणवीस

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊन  झाल्यानंतर नागरिकांना मदत केलेली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस नागपूरमध्ये बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या पॅकेजबाबत माहिती ट्विट करून दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, हे पॅकेज तिथल्या केंद्र सरकारने दिली आहेत, आपले केंद्र सरकार देणार आहेत का? अजून राज्याच्या हक्काचे पैसे नाही दिले.

आता आव्हाडांच्या टिकेला फडणवीसांनी उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झालाय. केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचे पॅकेज दिले होते, पण महाराष्ट्र राज्याने एकही पैसा नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी  काल भाषणात कोरोना वाढल्याची कारणे सांगितली नाही, उपाययोजना सांगितल्या नाही, मुख्यमंत्र्यांचे भाषण कशासाठी होते, तेच कळले नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.