Share

Uddhav Thackeray : “लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल”; उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश गवईंना विनवनी

Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) झालेल्या मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्ताच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील लोकशाहीच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांना थेट विनंती केली. ते म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे. आता तिला न्यायाचं पाणी पाजलं नाही, तर ती दम तोडेल.”

पक्ष आणि चिन्हावरील वाद

ठाकरे गटाचा पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूक आयोग (Election Commission) याने हा अधिकार आणि प्रतीक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिला आहे. यावर नाराजी व्यक्त करत ठाकरे यांनी सांगितले की, “आता न्यायालयाने लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला न्याय दिलाच पाहिजे.”

“माकडं संसदेत पोहोचली”

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावरून ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “दिल्लीतील न्यायालयाने रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडायला सांगितलं. कुणीतरी म्हटलं की कुत्रे पकडले तर झाडावरची माकडं खाली येतील. पण आता अशी माकडं थेट संसदेत पोहोचली आहेत.”

सरन्यायाधीश गवई हे कर्तव्यदक्ष असल्याचे सांगून ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आणि लोकशाही वाचवण्यासाठी खंडपीठ कोणतेही असले तरी त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी हात जोडून विनंती केली.

मुंबईवरील डाव कायम

मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणण्यापेक्षा मराठी माणसाने ती मिळवली, असं स्पष्ट करत ठाकरे यांनी इशारा दिला की, “मुंबईचा लचका तोडण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. कधी हिंदी सक्तीचा मुद्दा, तर कधी मुंबईचं महत्व कमी करण्याचे डाव रचले जातात. हे प्रयत्न करणाऱ्यांना संपवल्याशिवाय मार्मिक आणि शिवसेनेचं काम थांबणार नाही.”

लोकांचे लक्ष भरकटवण्याचे राजकारण

देश-राज्यातील मूळ प्रश्नांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सरकारकडून कधी कबुतरांचे, तर कधी रस्त्यावरील कुत्र्यांचे वाद पुढे आणले जात असल्याचा आरोप करत ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now