Share

Crime News : झोपेत असलेल्या नवऱ्यावर पत्नीने उकळतं तेल ओतलं, भाजलेल्या जखमांवर तिखट फासलं अन् म्हणाली, ‘जर ओरडलास तर…’

Crime News  : दक्षिण दिल्लीतील मदनगीर (Madan Gir) भागात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. 28 वर्षीय दिनेश (Dinesh) नावाच्या तरुणावर त्याच्या पत्नीने झोपेत असताना उकळतं तेल ओतून भयानक हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता तिने त्याच्या भाजलेल्या जखमांवर मिरची पूड फासली. सध्या दिनेश यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली. दिनेश झोपेत असताना, त्याची पत्नी साधना हिने उकळतं तेल घेऊन त्याच्या अंगावर आणि चेहऱ्यावर टाकलं. जखमांवर तीव्र वेदना होताच दिनेश उठण्याचा प्रयत्न करत असतानाच साधनाने त्याच्या भाजलेल्या त्वचेवर लाल मिरची पूड फासली. तो वेदनांनी तडफडत असताना साधनाने धमकी दिली. “जर आवाज केलास तर अजून तेल ओतेन.”

दिनेश यांच्या मते, त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कामावरून घरी आले, जेवले आणि पत्नी-मुलीसह झोपले. रात्री ३:१५ च्या सुमारास त्यांच्या अंगावर उकळतं तेल टाकल्याने ते भडकून उठले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारी आणि खाली राहणारे घरमालक धावत आले आणि दिनेशला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगत त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या शरीराचा सुमारे २० टक्के भाग भाजला आहे.

या घटनेपूर्वीही दाम्पत्यामध्ये सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आठ वर्षांपूर्वी झालेल्या त्यांच्या विवाहानंतर गेल्या काही वर्षांपासून मतभेद वाढले होते. दोन वर्षांपूर्वी साधनाने क्राइम अगेंस्ट वुमन सेल (Crime Against Women Cell) मध्ये तक्रार दिली होती, मात्र समुपदेशनानंतर काही काळ वाद शांत झाला होता. परंतु घटनेच्या दिवशीही त्यांच्या दरम्यान तीव्र वाद झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

मदनगीर पोलिस ठाण्याने (Madan Gir Police Station) साधनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम 118 (जाणीवपूर्वक दुखापत), 124 (धमकी) आणि 326 (गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या साधना फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. या घटनेने दक्षिण दिल्लीतील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now