Share

Congress On Delhi Bomb Blast: कुठे गेली छप्पन इंचाची छाती? किमान आता तरी जनाची नाही, मनाची लाज बाळगा..; दिल्ली स्फोटावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Congress On Delhi Bomb Blast : देशाची राजधानी दिल्ली (Delhi City) पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरून गेली. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात (Delhi Bomb Blast) 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हाय अलर्ट जाहीर केला आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास वेगात सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी या हल्ल्याला ‘केंद्र सरकारच्या अपयशाचं प्रतीक’ ठरवत, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

नाना पटोले यांचा केंद्रावर हल्लाबोल 

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं, “हे लोक बेशरम आहेत, हे राजीनामे देणार नाहीत. झोला घेऊन येतो आणि झोला घेऊन जातो, असं सांगणारे हे लोक देशाशी प्रामाणिक नाहीत. राजीनामा नको, पण देश सुरक्षित कसा राहील, याचं उत्तर द्यावं.” त्यांनी पुढे म्हटलं, “केंद्र सरकारने दाखवलेली स्वप्नं भंगली आहेत. आता जनाची नाही, मनाची लाज ठेवावी.”

‘छप्पन इंचाची छाती कुठे गेली?’

“कश्मीर असुरक्षित आहे, देशात दहशतवाद्यांचे हल्ले होत आहेत, मग मोदींची छप्पन इंचाची छाती कुठे गेली?” असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला. “आम्हाला यात राजकारण करायचं नाही, पण जेव्हा दिल्ली आणि केंद्र दोन्हीकडे त्यांचेच सरकार असताना दहशतवादी कसे आले? हा हल्ला त्यांच्याच अपयशाचं द्योतक आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, पण सरकार प्रचारात व्यस्त”

काँग्रेस नेत्यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटलं की, “पंतप्रधान आणि गृहमंत्री देशाच्या सुरक्षेपेक्षा निवडणुकीच्या प्रचारात अधिक व्यस्त आहेत. पुलवामा, पहेलगाम हल्ल्यावेळी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहिलो, पण आता केंद्र सरकार स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढतंय. ऑपरेशन शिंदूरसारखी आश्वासने देणारे आता मौन बाळगून आहेत.”

“अमित शहा काय करत आहेत?” 

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावरही नाना पटोले यांनी थेट टीका केली. ते म्हणाले, “गृहमंत्री बिहारमध्ये विना सुरक्षा आणि विना कॅमेरा एका हॉटेलमध्ये थांबले आहेत, ते कोणत्या लोकांना भेटत आहेत? देश असुरक्षित असताना ही बेफिकिरी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचा सरकारला इशारा

काँग्रेसने केंद्र सरकारला या घटनेबद्दल जबाबदार ठरवत, “जनतेचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर पारदर्शक तपास करा,” असा इशारा दिला आहे. “भाजप निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करते, पण देशहित आणि सुरक्षा हे त्यांच्या अजेंड्यावर नाही,” असा आरोप काँग्रेसने केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now