त्या DFO ला फाशी द्या, त्याच्यामुळेच माझ्या मुलीने आत्महत्या केली; दिपाली चव्हाणच्या आईची मागणी

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकरल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी(RFO) दिपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वन संरक्षक(DFO) विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दिपाली यांच्या आईने शिवकुमार यांना फाशी देण्याची मागणी केली आहे.

दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. याबाबतचे पत्र दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना लिहिले आहे. यात त्यांनी उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांनी त्रास दिला असल्याचे म्हटले आहे.

माझ्या मुलीला खूप दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्रास होत होता. शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होते. दिपालीला शिवीगाळ करत होते. त्यामुळेच त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या, अशी मागणी दिपालीच्या आई शकुंतला चव्हाण यांनी केली आहे.

तसेच, दिपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. दिपाली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे राजेश यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत आरोपी आणि त्याला सहकार्य कारणारे रेड्डी यांच्यावर कारवाई होत नाही. आणि दिपाली आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही दिपालीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. या घटनेनं राज्यभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. तर अनेक लोक आपला संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान, दिपाली यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत विनोद शिवकुमारला नागपूर-बंगळुरू राजधानीमधून पळून जात असताना अटक करण्यात आली आहे. तसेच रेड्डी यांच्यावर कारवाई झाली नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

दिपाली चव्हाण यांची सुसाइड नोट-
कामाच्या बाबतीत काहीही खटकले तर शिवकुमार आपल्याला निलंबित आणि चार्जशीट करण्याची धमकी द्यायचे. अक्टोंबर २०२० मध्ये प्रेग्नेसीमुळे मी ट्रेक करू शकले नव्हते तर मला सलग तिन दिवस कच्च्या रस्त्यावरून फिरवलं. त्यात माझा गर्भपात झाला. पण तरीही मला सुट्टी दिली नाही.

नोकरी परिवारासाठीच करतो. पण इथे राहून परिवारासोबत एक दिवस घालवता येत नाही. शिवकुमार हे रात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. याबाबत आधी तक्रार केली होती, असे दिपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

याशिवाय, शिवकुमार समोर शिविगाळ करतात. मला सहन होत नाही. कित्येक वेळा रात्री त्यांनी संकुलला बोलावले. आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मर्जीने न वागल्यास शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. इतकं लिहून देखील तुम्ही त्यांच काही बिघडवू शकणार नाही. कारण तुमचाच त्यांच्या डोक्यावर हात आहे.

माझे रोखलेले वेतन तत्काळ काढून द्यावे. माझ्यामृत्यूनंतरचे सर्व आर्थिक लाभ माझ्या आईला द्यावेत. शिवकुमार यांच्या बाबतच्या अनेक तक्रारी आहेत त्यांना कधी तरी गांभीर्यांने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचे नाव खराब होत आहे. स्टाफसोबत त्यांचे वागणे खूप वाईट आहे.

तसेच पुढे त्या लिहितात, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. ते खूप घाण शिव्या देतात. फिल्डवर खूप त्रास देतात. माझ्या आत्महत्येला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार सर्वस्वी जबाबदार आहेत.

शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा आहे. जे माझ्यासोबत झालं ते यापुढे कोणासोबत होऊ नये. असा आशय असलेली मनाला सुन्न करणारी सुसाइट नोट दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
रात्री मला भेटायला बोलवून…; लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे
सक्तीने निवृत्त केल्यामुळे आयपीएस अधिकारी मोदी सरकारवर संतापला, म्हणाला ‘जबरिया रिटायर्ड’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.