नुसती चर्चाच नाही, लगेच निर्णयही झाला; संभाजीराजेंची मराठा समाजासाठीची महत्वाची मागणी ठाकरे सरकारकडून मान्य

कोल्हापूर । कोल्हापूरचे भाजप खासदार संभाजीराजे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत. यामुळे त्यांनी राज्यभरात आंदोलने सुरू केली आहेत. त्यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे. मोदींना वेळ मागूनही मोदींनी त्यांना वेळ न दिल्याने ते भाजपवर नाराज आहेत.

ते खासदारकीचा राजीनामा देणार अशी देखील चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी ठाकरे सरकारचे कौतुक केल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.

या उद्घाटन कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारचे जाहीर कौतुक केले. केवळ चर्चा न करता निर्णयही झाला, सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली, त्याबद्दल ठाकरे सरकारचे कौतुक आणि आभार मानतो असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

यामुळे आता भाजपच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे म्हणाले, सारथीच्या उद्घाटनावेळी ४ वर्षापूर्वी मी उपस्थित होतो. सारथीला स्वायत्तता राहायला हवी ही आमची मागणी होती. एका अधिकाऱ्यामुळे ती गेली होती. चर्चा असो की संघर्ष आम्ही सर्व केले.

तसेच मराठा आरक्षणाचा लढा सुरुच राहील, वर्ष लागेल दोन वर्ष लागेल. पण समाजाला सक्षम करायचे असेल तर सारथी संस्था स्वत:च्या पायावर उभी राहणे आवश्यक आहे. त्यासाठीच तिची स्थापना झाली.

माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत, तसेच उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली, त्यात अनेक प्रश्न निकाली लागले. शाहूंच्या कर्मभूमीत सारथीचे उपकेंद्र देण्याचा निर्णय घेतला, केवळ निर्णय झाला नाही तर दोन सव्वा दोन एकर जमीन आणि इमारत हस्तांतरही झाली आहे.

संभाजीराजे म्हणाले, मी आज सरकारचे कौतुक आणि आभार मानले. सारथीला अद्ययावत संशोधन केंद्र करायचे असेल तर त्यासाठी किमान पाच एकर जमीन पाहिजे. सुरुवात चांगली झाली, यापुढेही चांगले काम होईल आणि खऱ्या अर्थाने शाहूंचा विचार सर्वदूर पोहोचेल, असे संभाजीराजे म्हणाले.

ताज्या बातम्या

बाबो! जगातील सर्वात हॉट आजीने सांगितले तिचे फिटनेस सिक्रेट, आजीचे फोटो पाहून फुटेल घाम

VIDEO: आपल्या आई वडिलांचा विचार कर आणि.., भारतीय जवानांनी समजवल्यानंतर दहशतवाद्याने केले सरेंडर

लग्नाच्या पहिल्याच रात्री असे काय झाले की, नववधूला जेलमध्ये जावे लागले?, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.