Homeइतरमृत्यूही हे नाते तोडू शकला नाही… पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणातच पत्नीने जग...

मृत्यूही हे नाते तोडू शकला नाही… पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणातच पत्नीने जग सोडले, एकाच चितेवर केले अंत्यसंस्कार

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रुण गावामधून एक भावनिक करणारी घटना समोर आली आहे. रुण गावातील ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. या गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. आता दोघांनी एकत्रच जगाचा निरोप घेतल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या पती-पत्नी दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराचे सर्व विधी हे त्यांच्या दोन्ही मुलींनी पूर्ण केले. आता नागौर जिल्ह्यात सर्वत्र या पती-पत्नीची चर्चा होत आहे. दोघेही खूप नशीबवान होते ज्यांना जीवन आणि मृत्यू दोन्ही सोबत मिळाले, असे लोक म्हणत आहेत. त्यांच्या अखेरच्या निरोपाची चर्चा संपूर्ण रुण गावात होत आहे.

नागौरमधील रुण गावात राहणारे ७८ वर्षीय राणाराम सेन यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे राणाराम सेन यांना उपचारासाठी नागौरहून जोधपूरला नेण्यात आले होते. जोधपूर येथील रुग्णालयात रविवारी पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. राणाराम यांचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्यांचा मृतदेह रुण गावातील त्यांच्या घरी पोहोचला.

राणाराम यांचे पार्थिव पाहिल्यानंतर त्यांची पत्नी भंवरी देवी यांना तो धक्का सहन झाला नाही. त्यांच्या पत्नीनेही त्याच ठिकाणी प्राण त्यागून जगाचा निरोप घेतला. मृत पुरूष व महिलेला दोन मुली असून त्यांचे फार पूर्वीच लग्न झाले होते. गावातील लोक सांगतात की, राणाराम सेन हे गावातील शनिदेव मंदिरात पुजाविधी करायचे. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते.

त्यांच्या दोन्ही मुलींना आई-वडिलांच्या निधनाने दु:ख झाले आहे. दोन्ही मुलींनी त्यांच्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. पती-पत्नी दोघांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रुण गावात पती-पत्नी दोघांच्या अंत्ययात्रेला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गावातील लोकांनी अश्रुंनी पती-पत्नी दोघांना निरोप दिला.

गावकऱ्यांनी सांगितले की, राणाराम सेन यांचा विवाह भंवरी देवीसोबत ५८ वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नी दोघांमध्ये गाढ प्रेम होते. दोघेही एकत्र राहून एकमेकांची काळजी घेत असत. त्यांची उणीव आम्हाला नेहमीच जाणवेल, असे गावकरी म्हणाले. या घटनेवरून पुन्हा एकदा अमर प्रेमाची व्याख्या समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अनोखी प्रेमकहाणी! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर दिला मुखाग्नी
’83’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून रणवीर सिंग ढसाढसा रडला, म्हणाला, हे काय आहे मला माहिती नाही पण..
बदली झाल्यानंतरही नवाब मलिक समीर वानखेडेंची पाठ सोडेनात; आता म्हणाले…