Amit Thackeray : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २५ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारताने तात्काळ मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदुर’ राबवले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले.
RAW च्या गुप्त माहितीनंतर संयुक्त कारवाई
या कारवाईसाठी भारतीय गुप्तचर संस्था RAW ने महत्त्वाची माहिती पुरवली होती. त्यानुसार पाकिस्तानमधील ४ आणि POK मधील ५ अड्ड्यांवर एकाचवेळी अचूक हल्ले करण्यात आले. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. देशभरातून या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.
अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया – “अजून समाधान नाही”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी या कारवाईचे कौतुक करताना, अजूनही मुख्य दहशतवादी मोकळे फिरत असल्यामुळे खरे समाधान मिळाले नसल्याचे मत व्यक्त केले. “ज्यांनी २५ निरपराध नागरिकांचे प्राण घेतले, ते अतिरेकी अजूनही जिवंत आहेत. त्यांचा पूर्ण खात्मा झाल्याशिवाय हा बदला पूर्ण झाला, असे वाटणार नाही,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आपली लष्कर यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. पण या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, हे दहशतवादी भारतात घुसले तरी कसे? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. ही बाब देशाच्या सुरक्षा यंत्रणेसाठी चिंतेची आहे.”
crush-the-terrorists-who-attacked-amit-thackeray