कोरोना झाला तरी चालेल पण लस नको, लसीकरणाला घाबरून गावकऱ्यांनी टाकल्या नदीत उड्या

देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना या महामारीला रोखायचे असेल तर आपल्या समोर लस हा एकच पर्याय दिसत आहे. कोरोना लसीकडे महत्वाचे शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. सरकारने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला परवानगी दिली आहे पण लसींचा खुप तुटवडा जाणवू लागला आहे.

देशात अशी परिस्थिती असताना आता एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. या घटनेने हे स्पष्ट होत आहे गावाकडील लोकांमध्ये लसीसंदर्भात अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजामुळे विचित्र घटना घडली आहे.

तर झाले असे की गावात लस देण्यासाठी आरोग्य कर्मचारी तर पोहोचले होते पण गावकऱ्यांनी लसीकरणापासून वाचण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांना बाहेर येण्यास सांगितले पण गावकरी ऐकायला तयार नव्हते.

यानंतर थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना तेथे यावे लागले आणि त्यांनी समजवल्यानंतर गावकरी पाण्याच्या बाहेर आले. ही घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील सिसौडा गावातील आहे. १५०० लोकसंख्या असलेल्या या गावातील फक्त १४ लोकांनी लस घेतली आहे.

या गावात जेव्हा आरोग्य विभागाची टीम दाखल झाली तेव्हा त्यांनी लसीकरणाबाबत सुचना दिल्या. सुचना देताच गावातील लोक घाबरले आणि गावाबाहेर वाहणाऱ्या नदीच्या काठी येऊन बसले. आरोग्य कर्मचारी त्यांना समजवण्यासाठी गेले पण त्यांनी थेट नदीतच उड्या मारल्या. ते प्रचंड घाबरले होते.

लसीकरणापासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचीही परवा केली नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. राजीव शुक्ला यांनी गावातील लोकांचा गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अखेर १४ लोकांनी लस घेतली. पण १५०० लोकांच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. सगळ्यांनी लस घेणे गरजेचे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.