कोरोना पॉझिटिव्ह पत्नी आणि मुलीच्या देखभालीसाठी नाही दिली सुट्टी; पोलिसाने दिला नोकरीचा राजीनामा

देशामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था पण त्यांचे उपचार करण्यात कमी पडताना दिसून येत आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस अहोरात्र सेवेत राबताना दिसून येत आहेत.

उत्तर प्रदेशातून एक घटना समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या मुलीची देखभाल करायला पण कुणी नाही. त्यातच त्या अधिकाऱ्याला सुट्टी मिळत नसल्याने त्याने त्याच्या पदाचा राजीनामा दिल्याची घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमधील झाशी येथील सर्कल ऑफिसर मनीष चंद्र सोनकर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झालेली होती. त्यांना त्यांच्या कोरोनाबाधित पत्नी आणि मुलीची देखभाल करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या पदाचाच राजीनामा दिला आहे. सोनकर यांनी त्यांच्या राजीनाम्याची प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच राज्यपालांना पण पाठवली आहे.

त्यांनी प्रत पाठविल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून पुढील निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मनीष सोनकर यांच्या पत्नीला ३० एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर मुलीची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी सोनकर यांच्यावर आली. त्यांची चार वर्षाची मुलगी त्यांच्यासोबत राहायला लागली.

पत्नी आजारी असल्यामुळे मुलीची सर्व जबाबदारी सोनकर यांच्यावर आली. त्याच दरम्यान त्यांची नियुक्ती पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीच्या ठिकाणी करण्यात आली. सोनकर यांनी सुट्टी मागत त्याची परवानगी एसएसपी यांच्याकडे मागितली. पण पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीचे कारण सांगून त्यांना सुट्टी नाकारण्यात आली.

त्यानंतर सोनकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मनीष सोनकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.