कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, अंत्यदर्शनासाठी निर्लज्ज रुग्णालयाने मागितली ५१ हजारांची लाच

 

कोलकाता | देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही जास्त आहे.

कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना पहायला मिळत आहे. यात कोरोना रुग्णाच्या निधनानंतरदेखील त्यांच्या नातेवाईकांना अंतिमदर्शन देण्यास रुग्णालय नकार देत असल्याच्या घटनाही घडत आहे.

आता अशीच एका धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या एका रुग्णालयात घडली असून, रुग्णाच्या निधनानंतर मृतदेहाच्या अंत्यदर्शनासाठी मुलाकडून रुग्णलयाने चक्क ५१ हजार रुपयांची मागणी केली आहे.

याविरोधात ज्या परिवाराला पैसे मागण्यात आले आहे. त्या परिवाराने रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मृत हरी गुप्ता यांचा मुलगा सागर गुप्ता यांनी इंडिया टूडेशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

रविवारी दुपारी आम्हाला रुग्णालयातून फोन आला आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. सुमारे १ वाजल्याच्या दरम्यान रुग्णालयातून आम्हाला फोन आला होता.

आम्हाला आधीच का सांगितले नाही, असे विचारले असता आमचा फोन नंबर नसल्याचे कारण रूग्णालयामधील अधिकाऱ्यांनी दिले. ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचलो त्यावेळी माझ्या बाबांचे पार्थिव थेट स्मशानभूमित घेऊन जात असल्याचे आम्हाला समजले.

वडिलांचे शेवटचे दर्शन व्हावे या हेतून आम्ही शिबपूर स्मशानभूमीजवळ पोहचलो त्यावेळी पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायचे असेल तर ५१ हजार रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली, अशी माहिती सागर गुप्ताने दिली आहे.

दरम्यान, गुप्ता परिवाराने ५१ हजार देण्यास नकार दिल्याने, समोरच्या व्यक्तींनी तडजोड करत ३१ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर गुप्ता परिवाराने थेट पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.