प्रतिक्षा संपली! कोरोना लसीचे १० कोटी डोस रशिया भारताला देणार

जगभरात सध्या कोरोनामुळेे सर्वकाही ठप्प आहे. यामुळे यावर लस कधी येणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

आता भारतात रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ लसीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता कोरोना लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. भारतातील औषध नियंत्रकांनी डॉ. रेड्डी लॅबला ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे.

संपूर्ण जगात मान्यता देण्यात आलेली ही पहिली लस आहे. रशियाने मानवी वापरासाठी या लशीला मंजुरी दिली होती. वेगवेळ्या केंद्रांवर आणि रँडम नियंत्रण परीक्षण पद्धतीने ही चाचणी करण्यात येईल.

तसेच लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का? आणि रोगप्रतिकारक शक्तीला कितपत चालना मिळते ते, कोरोना रुग्ण किती कालावधीत बरा होईल हे यामध्ये तपासले जाईल, असे डॉ. रेड्डी लॅब यांनी म्हटले आहे.

डॉ. रेड्डी लॅबने सुरुवातीला भारतातील मोठ्या लोकसंख्येवर या लशीची चाचणी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण तो नाकारण्यात आला. आता या लसीची रशियात तिसऱ्या फेजची ४० हजार नागरीकांवर चाचणी सुरु आहे.

गेल्या महिन्यात डॉ. रेड्डी लॅब आणि आरडीआयएफने या लशीची भारतातील चाचणी आणि वितरणासाठी भागीदारी केली होती. यामध्ये आपल्या देशाला १० कोटी डोस मिळणार आहेत. सुरुवातीला या लसीवर जोरदार राजकारण करण्यात आले. ही लस सुरक्षित नसल्याचे अनेकांनी म्हटले. कारण तिसऱ्या फेज आधीच या लशीला मान्यता देण्यात आली होती.

१०० पेक्षा कमी जणांवर लशीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करुन देण्यात आली. पुरेशा चाचणी अभावी ही लस हानीकारक ठरु शकते असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले होते. मात्र पुन्हा ही लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.