Shivsena : दसरा मेळाव्यासाठी आता अतिशय कमी अवधी शिल्लक आहे. मात्र, त्याआधीच शिवसैनिकांमध्ये वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. रामदास कदम यांचे पुत्र अजूनही शिवसेनेत असल्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काल (सोमवार) शिवसैनिकांची बैठक पार पडली. शिवसेना विभागप्रमुख, नेते आणि सचिव यांची ही बैठक होती. मात्र, या बैठकीत वाद निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे. रामदास कदम यांचा मुलगा अजूनही शिवसेनेत कसा?, असा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदार आपल्यासोबत घेऊन गेले. यात रामदास कदम यांचाही समावेश होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र योगेश कदम हेदेखील शिंदेंसोबत गेले. मात्र, त्यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम हा अजूनही शिवसेनेतच आहे. यावरून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
एवढेच नव्हे तर रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर अनेक टीकाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरचा शिवसैनिकांचा राग अजूनही कायम आहे. यातच रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम हे अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत आहे.
त्यामुळे त्यांना अजूनही युवासेनेच्या कार्यकारिणीत स्थान कसे? असा प्रश्न शिवसेनेच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलास पोतनीस यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण यांना हा प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देताना लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून निर्णय घेऊ, असे वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण यांनी म्हटले. या उत्तरावर विभागप्रमुख आणखी संतापले. त्यामुळे तिथले वातावरण चांगलेच तापले होते. त्यांनतर काही नेत्यांनी पुढाकार घेऊन हा वाद शांत केला.
या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई व सुरज चव्हाण हेदेखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या वादामुळे आता सिद्धेश कदम यांच्याबाबतीत शिवसेना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
shivsena : एकनाथ शिंदेंचा पुन्हा घराणेशाहीकडे कल : शिवसेना सचिवपदी केली नेत्याच्या मुलाची नियुक्ती
shivsena : ‘ही’ व्यक्ती प्रत्येक महीन्याला मातोश्रीवर १०० खोके घेऊन यायची; शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
shivsena : शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून एन्काऊंटर, पोलीस उपायुक्ताची शिवसेना नेत्याला धमकी
Eknath Shinde : अखेर निर्णय झाला! एकनाथ शिंदे होणार नवे शिवसेना पक्षप्रमुख