पवार म्हणाले की, सोलापूर हे सामाजिक प्रश्नांवर व्यापक दृष्टी ठेवून पुढे जाणारे शहर आहे. काही शक्ती जाणूनबुजून जाती-धर्मात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे शहर एकतेत कधीही तडजोड करत नाही. सोलापुरचे सामाजिक बांधिलकीचे बळ आजही कायम असून, अशा विभाजनकारी शक्तींविरुद्ध या शहराची भूमिका ठाम आहे.
बिहार निवडणुकीचे निकाल वेगळे
बिहार विधानसभा निवडणुकीवर बोलताना पवार म्हणाले की, आमच्याकडे असलेली माहिती काहीशी वेगळी होती, मात्र आलेला निकाल स्वीकारावा लागतो. निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महाराष्ट्र आणि बिहारमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर थेट आर्थिक मदत देण्यात आली. नगरपालिका निवडणुकीत पैसे फिरत असल्याची चर्चा ऐकण्यात आली, परंतु सरकारमार्फत महिलेच्या खात्यात थेट 10 हजार रुपये जमा करण्याचा प्रकार प्रथमच पाहायला मिळाला. याचा मतदानावर किती परिणाम झाला, हे लोकांनी स्वतः ठरवावे, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, सत्ताधाऱ्यांचा विजय हा फक्त पैशांच्या वितरणावर आधारित असेल, तर विरोधकांनीही यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी संसदीय अधिवेशनादरम्यान दिल्लीमध्ये सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत ठोस संयुक्त धोरण आखण्याची गरज आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप वगळता इतर पक्षांशी आघाडी शक्य
स्थानिक निवडणुकांबाबत बोलताना पवार म्हणाले की, नगरपालिका आणि नगर पंचायत स्तरावर आम्ही स्थानिक नेतृत्वाला निर्णय घेण्याचे अधिकार देतो. स्थानिक परिस्थितीनुसार पक्ष एकत्र येत असतात, आणि जर या आघाड्यांमध्ये भाजपला वगळून इतर पक्ष एकत्र येणार असतील, तर ते योग्य पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बेरोजगारीचा तरुणांवर खोल परिणाम
अलीकडे एका तरुणाने ‘लग्न जमत नाही’ म्हणून पवारांना पत्र लिहिले होते. माध्यमांनी त्यावर चर्चेचे वारे उठवले. पवार म्हणाले की, हा विनोद नसून एक कठोर वास्तव आहे. देशात अनेक ठिकाणी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिचा थेट परिणाम तरुणांच्या आयुष्यावर पडत आहे.
काँग्रेसच्या संदर्भात बोलताना पवारांनी सांगितले की, 1957 मध्ये महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती विजयी झाली तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. त्या वेळीही काँग्रेस आता संपणार असे म्हटले गेले, पण पक्ष संपला नाही. चढ-उतार राजकारणाचा भाग आहे. गांधी-नेहरू यांच्या विचारांवर चालणारी काँग्रेस पुन्हा एकदा मजबूत होईल, आणि देशाच्या राजकारणात वेगळ्या पातळीवर पोहोचेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.