“सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे”

मुंबई । परतीच्या पावसामुळे सध्या सर्व पक्षाचे नेते हे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यामध्ये उध्दव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या भागात पाहणी केली. यावरुन आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

तांबे यांनी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचे विमानातून पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोटो तसेच ठाकरे सरकारमधील नेत्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरुन पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावरुन त्यांनी भाजपवर टीका केली आहे. या फोटोवरुन आता राजकारण पेटले आहे.

या फोटोसह तांबे म्हणाले माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे. सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. काल फडणवीस हे चिखलातून रस्ता काढत शेतात गेले आणि ते फोटो सगळीकडे व्हायरल झाले.

दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला लवकरात लवकर मदत करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहे. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, या जिल्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. मोठे नुकसान झाले असल्यामुळे मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकरी करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.