Sanjay Raut on Devendra Fadnavis: राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टिका केली आहे. दिल्लीत गुपचूप गेलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन ‘शिवसेना भाजपात विलीन करा आणि मला मुख्यमंत्री करा’ अशी मागणी केल्याचा दावा राऊत यांनी केला. यासोबतच काही शिवसेना आमदार अडचणीत असल्याने त्यांनीही तक्रारी केल्याचे राऊत यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री असूनही फक्त बघ्याची भूमिका!’
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला कीव येते. स्वतःच्या प्रतिष्ठेचा चुराडा होत असताना ते फक्त बघ्याची भूमिका घेतात. हतबलतेचं दुसरं नाव म्हणजे फडणवीस!” असे घणाघाती शब्द वापरले.
पैशाच्या बॅगेसह व्हिडीओ, आरोप गंभीर
राऊत यांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या खोलीत बेडवर बसलेले दिसतात. बाजूला दोन बॅगा असून, त्यात पैशाच्या गडद गड्ड्या दिसत आहेत. या व्हिडिओवरून संजय राऊत यांनी ‘५० खोके एकदम ओके’ या चर्चित विधानाकडे पुन्हा लक्ष वेधलं. त्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
हॉटेलसाठी कोटींची बोली, आयकर नोटीस
संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी एका हॉटेलसाठी तब्बल ६७ कोटींची बोली लावल्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर आता या नव्या व्हिडीओमुळे ते पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याची माहितीही समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणात बोलताना त्यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचं नाव घेतल्याने आणखी खळबळ उडाली. मात्र, नंतर त्यांनी ते विधान ‘अनावधानाने झालं’ असे सांगत माघार घेतली.
सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सतत वादात सापडताना दिसत आहेत. आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासात केलेल्या मारहाणीमुळे आधीच वाद निर्माण झाला होता, आणि आता संजय शिरसाट यांच्यावरही टीका होत आहे. या सगळ्या घडामोडींवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारलाही टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शहा आणि पीएमओला टॅग करत ट्विट केलं आहे.