Chinmayee Sumeet On Jay Bhim : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinmayee Sumeet) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण या वेळी कारण आहे तिचं “जय भीम” म्हणणं! स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणारी ही अभिनेत्री सामाजिक विषयांवर नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते. मालिकांमधील किंवा चित्रपटांमधील प्रभावी अभिनयासोबत ती समाजघडवणाऱ्या विचारांवरही ठाम भूमिका घेते.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या (All India Democratic Women’s Association) 13 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात बोलताना चिन्मयीने “जय भीम” या अभिवादनामागचं तिचं भावनिक नातं उलगडलं. तिने सांगितले, “मी नेहमी नमस्कार केल्यानंतर ‘जय भीम’ म्हणते. त्यामुळे अनेकजण मला विचारतात की तू जयभीमवाली आहेस का? तर माझं उत्तर अगदी सरळ आहे – होय, मी जयभीमवाली आहे, मी आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) आहे.”
तिने पुढे सांगितले, “लोक वेगवेगळ्या व्यक्तींचे फॅन्स असतात. पण मी मात्र आंबेडकरांची फॅन आहे. मला वाटतं की भारतातील प्रत्येक भगिनीला ‘जय भीम’ म्हणावंसं वाटलं पाहिजे. कारण या शब्दामध्ये आत्मसन्मान, समानता आणि आदराचं भावनात्मक प्रतिक आहे.”
चिन्मयी म्हणाली की, “आपण सगळ्या महिला म्हणजे जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या. जनवादी म्हणजे लोकशाही विचारांचा अवलंब करणारे आणि स्त्रियांना समानतेचा दर्जा देणारे लोक. या संघटनेने नेहमीच ‘महिला म्हणजे प्रथम माणूस’ हे सत्य अधोरेखित केलं आहे. आपल्या राज्यघटनेने आपल्याला माणूस म्हणून जे हक्क दिले, ते बाबासाहेब आंबेडकरांनी (Babasaheb Ambedkar) दिले. म्हणून माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर ‘जय भीम’ म्हणत मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.”
अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी चिन्मयी ही मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांत कार्यरत आहे. ती दिग्गज अभिनेते सुमीत राघवन (Sumeet Raghvan) यांची पत्नी आहे. तिने मुरांबा, पोरबाझार, हृदयनाथ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच कलर्स मराठी (Colors Marathi) वरील जीव झाला येडा पिसा या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
तिच्या “जय भीम” या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी तिच्या धाडसी भूमिकेचं स्वागत करत तिच्या विचारांना सलाम केला आहे.