‘चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्येच’ – सामनातून शिवसेनेची टीका

मुंबई । चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातसारख्याच राज्यात आहे. देशात ‘5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई कंपनीला मिळाले आहे, असा दावा शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

हुवेई या कंपनीच्या हातात देशाच्या डिजीटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातली मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे. अशी घणाघाती टीका सामनातून सरकारवर करण्यात आली आहे.

चिनी अ‌ॅप्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरही शिवसेनेने सामनातून निशाणा साधला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा धोका असल्याने या चिनी अ‌ॅप्सवर बंदी घालण्यात आली, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

या अगोदर इतके वर्ष हे अ‌ॅप्स सुरूच होते. मग राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्षच केले असा आरोप विरोधकांनी केला तर यावर सरकारची काय भूमिका असेल? असा सवालही सामनातून सरकारला विचारण्यात आला आहे.

चीनविरोधात भारताने मोठे पाऊल उचलत चीनच्या 59 अ‌ॅपवर सरकारने बंदी घातली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशनचा यामध्ये समावेश आहे.

या निर्णयाचे स्वागत केले गेले. मात्र शिवसेनेने यावर टीका देखील केली आहे. सध्या दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.