child dies while watching mobile reel : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मंडी धनोरा (Mandi Dhanora) परिसरात एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. चौथीत शिकणारा मयंक कुमार (Mayank Kumar 10 year old boy) घरात पलंगावर आडवा पडून मोबाईलवर रील पाहत होता. आई स्वयंपाकघरात, वडील अंगणात काम करत असताना काही मिनिटांतच नियतीने घात केला आणि मयंक पलंगावरून खाली कोसळला. आवाज ऐकून कुटुंबीय धावले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
मयंकच्या अचानक मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याचा संशय व्यक्त केला असला, तरी शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. त्यामुळे या घटनेभोवती गूढ अधिकच गडद झालं आहे.
ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. घरात सगळे जवळ असतानाही काही क्षणांत सगळं संपून जाईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. अचानक कोसळल्यावर सुरुवातीला भोवळ आली असावी, असा कुटुंबाचा समज झाला. मात्र हालचाल पूर्णपणे थांबल्याचं लक्षात येताच आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला.
बेशुद्ध अवस्थेत मुलाला उचलून आधी जवळच्या डॉक्टरांकडे आणि नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हसत-खेळत मोबाईल पाहणारा मुलगा क्षणात निघून गेला, यावर आई-वडिलांचा विश्वास बसत नव्हता.
मयंकच्या मृत्यूनंतर गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोबाईलचा अतिवापर, स्क्रीनकडे सतत पाहणं, रेडिएशन, तसेच लहान वयात हृदयविकाराच्या वाढत्या घटना यावर लोकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र शवविच्छेदन न झाल्यामुळे या सगळ्या चर्चा अंदाजावरच आधारित आहेत.
एका साध्या घरातील हा कोवळा जीव असा अचानक निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पालकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं असून, लहान मुलांच्या मोबाईल वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.