Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राखी प्रदान कार्यक्रमात बहिणींच्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातून आतापर्यंत ३६ लाख ७८ हजार बहिणींच्या राख्या माझ्याकडे पोहोचल्या आहेत. काही बहिणींच्या पत्रांमधून त्यांच्या भावना देखील मला मिळाल्या आहेत. त्या सर्व बहिणींची राखी आणि प्रेम मी स्वीकारतो. जन्मभर मला या प्रेमातच राहायचं आहे आणि त्यांच्यापुढे कधीही उत्तरायी होण्याचा भार मला नाही, हेही मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.”
लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री
फडणवीस पुढे म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सर्व बहिणींच्या राख्या आणि प्रेम स्वीकारले. आम्ही नाती निभावणारे लोक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या देशाच्या विकासाचं स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात त्यांनी सांगितलं की, विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकसंख्येतील ५० टक्के हिस्सा म्हणजे महिला या प्रवासाचा भाग असायला हवा. त्यामुळे महिला लक्षित योजना सुरु केल्या. मोदींनी महिला केंद्रित विकासाचं मॉडेल देशात सुरु केलं. बेटी बचाव, बेटी पढ़ावपासून हा प्रवास सुरु झाला आणि आता लखपती दीदीपर्यंत पोहोचला आहे. मी लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळेच मुख्यमंत्री झालो. नव्या भारतात बहिणी समान भागीदार असतील.”
योजना पाच वर्षे कायम राहतील
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “आज सुरु झालेल्या काही योजनांविषयी लोक म्हणतात की निवडणुकीनंतर त्या बंद होतील. मी तुम्हाला सांगतो, पाच वर्ष मी सुरु केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. तुमच्या आशिर्वादाने पुन्हा सरकार आली तर २०२९ पर्यंत या योजना सुरू राहतील. लाडकी बहीण योजना देखील पाच वर्ष थांबणार नाही.”
फडणवीस यांनी या कार्यक्रमात बहिणींच्या सहभागाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांच्या प्रेमामुळे राज्याच्या योजनांना स्थिरता मिळणार असल्याचं अधोरेखित केलं.