बाबा… तुम्ही लवकर घरी या! नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या कोब्रा कमांडोच्या निरागस मुलीची आर्त हाक

मुंबई : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित  शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची अमित शाह यांनी पाहणी केली.

या पार्श्वभूमीवर हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना आर्त साद घातली आहे. बेपत्ता कमांडोच्या निरागस लहान मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. डोळ्यातले अश्रू सावरत माझे वडील लवकर परत यावेत अशी विनंती करताना ती या व्हिडिओमध्ये दिसतेय.

शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे, असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी सोमवारी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला.

दरम्यान, मनहास यांच्या लहानग्या मुलीला वडिलांची खूप आठवण येत असून, ते घरी आले नाही, म्हणून तिला अक्षरशः रडू कोसळत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला असून, वडिलांच्या आठवणीने लहानगी रडत असून, बाबा, तुम्ही लवकर घरी या, अशी आर्त साद घातल्याचे पाहायला मिळत आहे.

मुलीच्या या निरागस सादेमुळे आजूबाजूला असलेल्या उपस्थितांचे डोळेही नकळत पाणावले. तसेच जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. राकेश्वर सिंह मनहास यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पतीला सुरक्षित परत आणण्याची कळकळीची विनंती केल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा

अमित शहांनी चेतावणी दिल्यांनतर नक्सली बिथरले, पत्र जारी करून म्हणाले..

१०० कोटी वसुलीचे आरोप अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती, रिलायन्सशी भागीदारी; जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.