Share

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : तासाभरात दोन-दोन GR निघतात, मी गप्प बसणार नाही; मराठा आरक्षण प्रकरणी भुजबळ आक्रमक

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलं आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal leader) यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. “एका तासात दोन-दोन जीआर निघतात, त्यावर सचिवांची सही असते, मग मी कसा काय गप्प बसू? मी माझं मत स्पष्ट मांडणारच,” असं ते म्हणाले.

पात्र शब्दावरून निर्माण झाला गोंधळ

भुजबळांनी सांगितलं की, सुरुवातीच्या जीआरमध्ये मराठा समाजातील ‘पात्र’ व्यक्तींना नमूद करण्यात आलं होतं. मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange activist) यांनी या शब्दाला आक्षेप घेतल्यानंतर सरकारनं दुसरा जीआर काढत ‘पात्र’ हा शब्द काढून टाकला. “जर पहिला चुकीचा होता तर तो का काढला? आणि एका तासात दुसरा कसा काय येतो? हीच मोठी शंका आहे,” असं भुजबळ म्हणाले.

ओबीसींवर अन्याय होणार

मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. “एका घरात दहा माणसं राहत असतील तर त्यांना बाहेर काढलेलं नाही, पण आणखी दहा बसवल्यास धक्का बसणारच. शिक्षण, नोकरी आणि राजकारणातील ओबीसींच्या वाट्याला आलेलं आरक्षण आता कमी होणार,” असा इशारा त्यांनी दिला.

कोर्टाच्या निरीक्षणाचा दाखला

भुजबळांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा दाखला देत सांगितलं की, “कुणबी आणि मराठा या दोन वेगळ्या जाती आहेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलात तरी सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागास नाही, म्हणून आरक्षण देता येत नाही.”

दिशाभूल करू नका – भुजबळांचा टोला

भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटलं, “जीआर माझ्या सल्ल्याने काढला अशी दिशाभूल करू नका. मी आधीच सांगितलं होतं की कुणबींना द्यायला मला हरकत नाही, पण मराठा आणि कुणबी वेगळे आहेत. जीआर माझ्या नावावर ढकलणं चुकीचं आहे.”

दबावाखाली निर्णय?

“एका तासात कधी कुठल्याही जीआरमध्ये बदल होतो का? हे दबावाखाली होत आहे की दुसऱ्या कोणत्या कारणाने? सरकारनं याचं उत्तर द्यायला हवं,” असा थेट सवालही भुजबळांनी केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now