Uddhav Thackeray : मुंबई – वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संसदेत झालेली जोरदार चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही तापू लागली आहे. लोकसभेत बुधवारच्या दिवशी सुधारणा विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विधेयक मतदानानंतर 288 विरुद्ध 232 मतांनी मंजूर करण्यात आलं.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं की, “जर खरे हिंदुत्ववादी असाल, तर झेंड्यावरचा हिरवा रंग हटवा. वक्फच्या जमिनी व्यापारी मित्रांना देण्यासाठी बळकावल्या जात आहेत. आम्ही त्याचा विरोध करतो.” तसेच त्यांनी भाजपवर ‘लांगुलचालन’ आणि ‘फोडा आणि राज्य करा’ धोरणाचे आरोप केले.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला.
“ठाकरे गटाचा वक्फ विरोधामुळे जनतेत रोष” – बावनकुळे यांचा आरोप
बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही. आता त्यांच्या उमेदवारांना कोणीही मत देणार नाही.”
तसेच, त्यांनी दावा केला की “ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केलं, त्यांना आता पश्चात्ताप होतोय.”
“हिंदुत्व सोडल्याचा पुरावा” – बाळासाहेबांचा वारसा कुठे?
बावनकुळे पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडले आहेत. काँग्रेससोबत हातमिळवणी करून मतांसाठी विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. खासदारांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा विचार करूनच वक्फ विधेयकाचा विरोध केला.”
याच मुद्द्यावर ते म्हणाले, “ठाकरे गटातील अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता नाराज आहेत. काहीजण तर थेट भाजपात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. मला अनेक फोन आणि मेसेज आले आहेत.”
राजकीय शह-काटशह सुरुच
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून सुरू झालेल्या या राजकीय कलगीतुऱ्याचे पडसाद आगामी लोकसभा आणि महापालिका निवडणुकांवर स्पष्टपणे उमटू शकतात. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार भाजपवर हल्लाबोल करत असताना, भाजप मात्र त्यांना ‘विचारभ्रष्ट’ ठरवण्याचा प्रयत्न करत आहे.
एकूणच, वक्फ सुधारणा विधेयकाने संसदेत फक्त कायद्याची मांडणीच केली नाही, तर महाराष्ट्रात नव्या राजकीय लढाईची चुणूकही दाखवली आहे.