मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला. नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला.

अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत होते. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका बाजूला मोदींनी ही घोषणा केली असली तरी भाजपच्या काही नेत्यांना ती अजूनही मान्य नाही. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजावून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे, मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातल्या एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यामध्ये चुकीचे काय होते? या देशामध्ये काही चांगले असले की मोदींना विरोध.

त्यांच्या निर्णयांना विरोध मग ते सर्वसामान्यांच्या हिताचे असले तरी चालतील. त्यामुळे एका छोट्या गटाला पटवून देण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याचे मोदींने म्हटले. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार होता, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्यात आले. दिल्लीतील या आंदोलनात शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपले आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात लोकांनी प्राणाची आहुती दिली.

शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. 7 वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असेही अनेकांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.