“मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस म्हणजे चंद्रकांत पाटील”

पंढरपूर । पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. प्रमुख पक्षांचे मोठे नेते पंढरपूरला ठाण मांडून आहेत. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मोठ्या प्रमाणावर सभा घेत आहेत.

यादरम्यान त्यांनी प्रचारसभेत भाजप नेते माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही.

तसेच चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणे नाही. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही.

त्यांनी टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही, असे म्हणत अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते देखील उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

तसेच ते म्हणाले राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह मोठे नेते प्रचाराला उतरले आहेत. राष्ट्रवादीकडून देखील मोठे मंत्री प्रचार करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.