Share

Solapur Crime: ‘चड्डी गँग’ची पुन्हा एंट्री, काळा टी-शर्ट, तोंडावर कापड आणि हातात दगड… सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Solapur Crime:  सोलापूर (Solapur) शहरात पुन्हा एकदा ‘चड्डी गँग’ नावाची कुख्यात टोळी सक्रीय झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीच्या तयारीत असलेले काही तरुण शहरातील विविध परिसरांमध्ये फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाले आहेत. त्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.

घटना नेमकी काय?

रविवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेदरम्यान, सोलापूरमधील वसंत विहार (Vasant Vihar), थोबडे नगर (Thobade Nagar), स्वराज्य विहार (Swarajya Vihar) आणि गुलमोहर सोसायटी (Gulmohar Society) या परिसरांमध्ये चार तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांचे चेहरे कपड्यांनी झाकलेले होते आणि त्यांनी फक्त काळा टी-शर्ट व चड्डी घातलेली होती. त्यांच्या हातात घरफोडीसाठी वापरली जाणारी उपकरणं आणि दगड असल्याचं स्पष्टपणे सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे.

घरफोडीपूर्वीची तयारी?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या टोळीने घरांच्या बाहेर असलेल्या वस्तूंमध्ये हालचाल केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ही गँग चोरी करण्याआधी परिसराची पाहणी करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागरिकांनी या प्रकाराबाबत सोलापूर पोलीस (Solapur Police) प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, चड्डी गँगच्या वाढत्या वावरामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांकडून काय कारवाई?

पोलीस सध्या रात्रीच्या वेळेस गस्त वाढवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र तरीही अशा टोळ्यांचा मोकळा वावर हा गंभीर मुद्दा मानला जात आहे. ही गँग नेमकी स्थानिक आहे की बाहेरून आलेली, याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की त्यांनी गस्तीत वाढ करून गृहनिर्माण सोसायट्या आणि उपनगरांमध्ये सुरक्षा मजबूत करावी.

यापूर्वी कोयता गँग (Koyta Gang) नावाची टोळी अनेक भागांमध्ये धुमाकूळ घालून गेली होती. त्यानंतर आता पुन्हा चड्डी गँगच्या हालचाली सुरू झाल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. या टोळीचे सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच वाढली आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now