#Big Breaking| काश्मीरमधून 10 हजार जवानांना तात्काळ हलवण्याचे केंद्र सरकारचे आदेश

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या 10 हजार जवानांना माघारी बोलावण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एकूण 100 तुकड्यांना जम्मू काश्मीरमधून तात्काळ माघारी येण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या तुकड्यांना आपल्या तळावर परतण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम हटवण्यात आल्यानंतर या जवानांना तैनात करण्यात आलं होतं.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बळाच्या प्रत्येकी 20 तुकड्या या आठवड्याअखेर जम्मू काश्मीरमधून हटवल्या जातील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एका तुकडीत 100 जवान असतात.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधी मे महिन्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 10   तुकड्या माघारी बोलवल्या होत्या. नव्याने तुकड्या माघारी बोलावल्यानंतर आता काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या 60 तुकड्या तैनात असतील. प्रत्येक तुकडीत 1 हजार जवान असतील.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.