अखेर ई-पास रद्द; राज्यांतील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी आता पासची गरज नाही

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लॉकडाउनच्या तीन टप्प्यांनंतर अनलॉक घोषित करण्यात आला. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल केला जात आहे.

राज्याअंतर्गत आणि राज्या-राज्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीवरील बंदीवरून केंद्राने राज्यांना फटकारले आहे. त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे निर्दश दिले आहेत. केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात तिथल्या परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल होत आहेत.

काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्बंधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्याने हे निर्देश जारी केले आहेत.

वाहतुकीवरील असणाऱ्या निर्बंधाचा परिणाम लोकांच्या रोजगारावर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारांकडून लादले जाणारे हे निर्बंध गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारांनी राज्यांतर्गत आणि देशात कुठेही सामान वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध लादू नयेत,असं केंद्र सरकारने आज दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे आता कुठेही जाण्यासाठी नागरिकांना ई पासची गरज लागणार नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.