मुकेश अंबानी, संजय राऊतांसह ९७ जणांना पद्म पुरस्कार देण्याची राज्याची शिफारस मोदी सरकारने नाकारली

मुंबई | पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे ९८ मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती; पण त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला.

मात्र केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर ९७ व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह विविध मान्यवरांचा या यादीत समावेश होता. पद्मश्रीसाठी खा. संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे यांच्यासह ८८ नावांची शिफारस राज्याकडून केली गेली होती.

यामध्ये प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते. मात्र, महाराष्ट्रातून कोणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही, तर सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’
खास कॅप्शनसह वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो; ‘या’ शब्दात केलेय बायकोचे कौतूक..
पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा! ‘बर्ड फ्लू’साठी मिळणार मदत, वाचा काय म्हणाले मंत्री…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.