सीबीआय इन ॲक्शन! सुशांतचा मॅनेजर व कुकच्या चौकशीतून झाली वेगळीच माहिती उघड

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास पहिल्यापासून सुरू करणार आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय पहिल्याच दिवशी अँक्शन मोड मध्ये दिसून आली आहे.

या प्रकरणाचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत असलेल्या, सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची तब्बल ५ तास चौकशी केली. सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा नव्याने तपास करत आहेत.

सीबीआयने सॅम्युअलला कोणते प्रश्न विचारले याची माहिती अद्याप मिळाली नाही. परंतु असे म्हटले जाते की, १३ जून आणि १४ जून रोजी सुशांतच्या घरात काय घडले हे स्पष्ट शब्दात जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सीबीआयचे पथक सुशांतचा मित्र संदीप सिंग याची देखील परत चौकशी करणार आहे.

त्यानंतर, शुक्रवारी सकाळी प्रथमच सीबीआयने सुशांतचा कुक नीरजला चौकशीसाठी बोलावून घेतले. त्याची १० तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली गेली. सीबीआयने डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचीही भेट घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यूच्या वेळी कुक नीरजही तेथे उपस्थित होता. मृत्यूपूर्वी सुशांतने त्याच्याकडे १ ग्लास पाणी मागितल्याचे नीरजने माध्यमांना सांगितले होते.

सुशांत सर आतून कधीच दरवाजा बंद करत नाहीत, असेही नीरजने सांगितले होते. असे मानले जाते की नीरज यांचे विधान या प्रकरणात खूप महत्वाचे आहे.

दरम्यान, सीबीआयच्या एका पथकाने वांद्रे पोलिस स्टेशन गाठले आहे. त्यानंतर सुशांतची डायरी आणि कागदपत्रे पोलिसांकडून घेण्यात आली. सुशांतचा अहवालही सीबीआयला प्राप्त झाला असून, सुशांतचा फोनही सीबीआयला मिळाला आहे.

दरम्यान, सीबीआयची एक टिम सुशांतच्या घरी डमी टेस्टची तयारी करत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करत असलेली सीबीआयची टीम शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे पोलिस ठाण्यातून बाहेर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने पोलिसांकडून केस डायरी, तीन मोबाइल फोन आणि सुशांतचा लॅपटॉप जप्त केला आहे. यासह सुशांतच्या बेडरूममधून या घटनेतील चादर आणि हिरवा कपडाही घेण्यात आला आहे, ज्याद्वारे सुशांत फॅनवर लटकला होता.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत केसबरोबरच दिशा सॅलियनच्या मृत्यूचीही चौकशी सीबीआय करणार आहे. सुशांतच्या मृत्यूचा दिशाच्या मृत्यूशी काही संबंध आहे की नाही, याचा तपास सीबीआय करणार आहे.

असे बोलले जाते की, सुशांत दिशाच्या मृत्यूमुळे खूप नाराज झाला होता, हे आधीच उघड झाले होते. त्यामुळे या दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी काय संबंध आहे का? हा प्रश्न सीबीआयसमोर उपस्थित झाला आहे. म्हणूनच १३ आणि १४ जून रोजी काय घडले? याचा तपास सीबीआय करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.