Share

Business Success Story: 400 रुपयांतून सुरू केला व्यवसाय, खास उत्पादनातून उद्योजिका कमवतायत वर्षाला तब्बल 60 लाख

Business Success Story : शेतकरी–मातीच्या गावातल्या कष्टाळू महिलांना नवा मार्ग दाखवणारी डॉ. बसु चौधरी (Dr. Basu Choudhary) यांनी 2011 साली अगदी छोट्या गुंतवणुकीतून उद्योजकतेची स्वप्नं उभी केली. मोठमोठ्या यंत्रणा, भरीव खर्च किंवा गुंतागुंतीपेक्षा विज्ञानावर आधारित साधा प्रयोग त्यांनी निवडला. हिमाचलमधील सोलन परिसरातून त्यांनी केवळ 400 रुपयांत 5 किलो ऑयस्टर मशरूम स्पॉन (Oyster Mushroom Spawn) मागवलं. गव्हाच्या भूशात भरलेल्या 50 पिशव्यांमध्ये हा पहिला प्रयोग करून त्यांनी सुरुवात केली, आणि या छोट्याशा प्रयत्नातून तब्बल 150 किलो उत्पादन निघालं. स्थानिक बाजारात 200 रुपये किलो दराने हे उत्पादन विकून तब्बल 30,000 रुपये मिळाले, आणि याच यशानं त्यांच्या उद्योजकतेला दिशा मिळाली.

आज या प्रयोगातून सुरू झालेली सफर एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित झाली आहे. सध्या डॉ. बसु (Dr. Basu) यांनी आपली प्रयोगशाळा 200 चौरस फूटांपर्यंत वाढवली असून, विविध विदेशी मशरूम आणि त्यांच्या स्पॉनच्या विक्रीतून त्या वर्षाला तब्बल 60 लाख रुपयांची उलाढाल करतात. ‘ऑर्डर-आधारित उत्पादन’ प्रणालीमुळे त्यांचं काम सातत्यपूर्ण राहातं. केवळ सुकलेल्या मशरूमची विक्री नव्हे, तर कॉर्डिसेप्सच्या ‘कल्चर टेस्ट ट्यूब सेट’च्या विक्रीमधून त्यांना दरमहा आणखी 70 हजार रुपये मिळतात. त्यांच्या मते, विदेशी मशरूमचा सुगंध, चव आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे त्यांची मागणी देशभर वाढत आहे, आणि हे तरुणांसाठी उत्तम करिअर ठरू शकतं.

उत्पादनांची किंमत आणि वाढती मागणी

अनुभव वाढल्यानंतर त्यांनी वर्षभर चालणाऱ्या उत्पादनासाठी बटन आणि मिल्की मशरूमच्या जातींवर काम सुरू केले. त्यानंतर शीटके, किंग ऑयस्टर, लायन्स मेन, रीशी अशा विदेशी प्रजातींकडे वळल्या. 2017 मध्ये त्यांनी थायलंडमधून कॉर्डिसेप्स मिलिटेरिसचे कल्चर आणले आणि प्रयोगशाळेत यशस्वीपणे वाढवलं. हेच मशरूम हिमालयात ‘कीडा जडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. औषधी मूल्यांमुळे हे 3 ते 3.5 लाख रुपये किलोपर्यंत विकले जाते. दर तीन महिन्यांनी त्या सुमारे 20 किलो उत्पादन करतात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत मोठा नफा कमावतात.याशिवाय फार्मा कंपन्यांच्या मागणीनुसारही पुरवठा करतात.

ग्रामीण महिलांसाठी मोफत प्रशिक्षण 

प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर त्यांनी स्थानिक उत्पादकांना ऑयस्टर स्पॉनचा पुरवठा सुरू केला. ग्रामीण महिलांना मोफत स्पॉन आणि प्रशिक्षण देत त्यांच्या कुटुंबाच्या अन्नात प्रथिनांची भर घातली. सामाजिक कार्यातील या योगदानामुळे त्यांना डॉक्टरेट पदवीही मिळाली. त्यामुळे त्यांचा हा उपक्रम केवळ व्यवसाय न राहता स्त्री-सक्षमीकरण आणि पोषक आहाराचा मार्गदर्शक ठरला.

2013 मध्ये त्यांनी एमएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी 20 किलो स्पॉन वापरून 600 किलो उत्पादन काढलं. स्थानिक विक्रीसोबत मशरूम पावडरचीही विक्री सुरू केली. पोस्ट-ग्रॅज्युएशनदरम्यान टिश्यू कल्चर आणि मशरूम फार्मिंगचं प्रशिक्षण घेतल्यामुळे यशस्वी लॅब उभारण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळालं. 2014 मध्ये कर्ज घेऊन त्यांनी 100 चौरस फूटांमध्ये लॅब उभारली आणि उपकरणांसाठी सरकारकडून 2 लाखांची सबसिडी मिळाली. आज हीच लॅब 60 लाखांच्या व्यवसायाचं केंद्र बनली आहे.

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now